मॉस्को/किव्ह – रशिया व समर्थक फौजांनी सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कला जोडणारा तिसरा पूलही उडवून दिला आहे. त्यामुळे या शहरात असणाऱ्या युक्रेनी लष्करासमोर आता शरणागती किंवा मृत्यू हे पर्याय शिल्लक असल्याचा इशारा रशियासमर्थक अधिकारी एदुआर्द बासुरिन यांनी दिला. बासुरिन हे ‘डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक’चे लष्करी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कला जोडणारे दोन पूल रशियन लष्कराने यापूर्वीच उडवून दिले होते. आता तिसरा पूल उडवून दिल्याने युक्रेनी फौजांच्या माघारीचे मार्ग बंद झाल्याचे मानले जाते.
रशियाकडून डोन्बास क्षेत्रासाठीची मोहीम दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. रशियाने सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क या दोन शहरांव्यतिरिक्त बाखमत तसेच स्लोव्हिआन्स्क या शहरांवरील नियंत्रणासाठीही आक्रमक हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह व दक्षिण युक्रेनमधील मायकोलव्ह भागांमध्येही रॉकेट तसेच क्षेपणास्त्रांचा मारा नव्याने सुरू केला आहे. या हल्ल्यांमागे डोन्बासमधील युक्रेनी लष्कराला मिळणारी शस्त्रे व इतर रसद नष्ट करणे हा मुख्य हेतू असल्याचे मानले जाते. सोमवारी रशियाने पूर्व युक्रेनमधील युडाश्ने रेल्वेस्थानकावर हल्ला चढवून परदेशी शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. यासाठी ‘हाय प्रिसिजन मिसाईल’चा वापर केल्याचे सांगण्यात आले.
सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कमधील पूल उडविण्याबरोबरच सेव्हेरोडोनेत्स्क शहरातील केमिकल फॅक्टरीवरही जोरदार हल्ले करण्यात आले. या फॅक्टरीत युक्रेनी लष्करी तुकड्यांसह अनेक नागरिकांनी आश्रय घेतल्याचे मानले जाते. युक्रेनी फौजांकडून या फॅक्टरीला रशियाविरोधी संघर्षाचा नवा तळ बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. हे प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून रशियाने या फॅक्टरीवर तोफा तसेच रॉकेट्सच्या सहाय्याने जबर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमुळे फॅक्टरी परिसरात अनेक ठिकाणी आग भडकली असून आश्रय घेतलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियाकडून डोन्बास क्षेत्रात सुरू असलेल्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ची मागणी पुढे केली आहे. अमेरिकेची ‘पॅट्रियॉट’ अथवा इस्रायलच्या ‘आयर्न डोम’प्रमाणे युक्रेनला प्रगत हवाई सुरक्षायंत्रणेचे आवश्यकता आहे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने युक्रेनवर तब्बल अडीच हजारांहून अधिक क्रूझ मिसाईल्स डागली असल्याचा दावाही युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |