रशियाकडून युरोपचा इंधनवायू पुरवठा रोखण्याचे संकेत

- युरोपातील इंधनाचे दर कडाडले

इंधनवायू पुरवठा

मॉस्को – तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून रशियाने युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीचा इंधनवायू पुरवठा घटविला आहे. त्याचवेळी फ्रान्स, इटली व ऑस्ट्रियातील कंपन्यांनीदेखील रशियाकडून होणारा इंधनवायूचा पुरवठा कमी झाल्याचे दावे केले आहेत. युरोपिय देश अमेरिकेसह आफ्रिका तसेच आखाती देशांशी इंधनवायूचे करार करीत असतानाच हा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात रशिया युरोपिय देशांचा इंधनपुरवठा रोखण्याचे संकेत मिळत असून जर्मनीने या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, युरोपातील इंधनवायूचे दर 60 टक्क्यांनी कडाडले असून प्रति हजार घनमीटर दीड हजार डॉलर्सवर गेले आहेत.

रशियाची आघाडीची इंधनकंपनी ‘गाझप्रोम’ने गेल्या काही दिवसात जर्मनीला करण्यात येणारा नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा घटविण्यास सुरुवात केली आहे. जर्मन कंपनी ‘सिमेन्स एनर्जी’ने दुरुस्तीसाठी पाठविलेली यंत्रणा निर्बंधांच्या कचाट्यात अडकल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा रशियन कंपनीने केला. गेल्या तीन दिवसात रशियाने ‘नॉर्ड स्ट्रीम1′ इंधनवाहिनीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या इंधनवायूचा पुरवठा तब्बल 60 टक्क्यांनी कमी केला आहे.

इंधनवायू पुरवठा

रशिया ‘नॉर्ड स्ट्रीम1′ इंधनवाहिनीच्या माध्यमातून प्रतिदिन जर्मनीला 16.7 कोटी घनमीटर इंधनवायू पुरवितो. गुरुवारी हा पुरवठा अवघ्या 6.7 कोटी घनमीटरपर्यंत खाली आला आहे. रशियाने पुढे केलेले कारण पटण्यासारखे नसून इंधनवायूचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय हा राजकीय हेतूंनी घेण्यात आला आहे, असा आरोप जर्मन सरकारने केला आहे. हिवाळ्याच्या आधीच्या काळात देखभाल अथवा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित होत नाही, असा दावा जर्मन मंत्र्यांकडून करण्यात आला आहे. जर्मन सरकारने आपल्या नागरिकांना वीजेच्या वापरात बचत करण्याचेही आवाहन केले आहे.

जर्मनीतील ऊर्जा नियंत्रक संस्थेने रशियाच्या निर्णयाचे तीव्र परिणाम हिवाळ्याच्या काळात भोगावे लागतील, असे बजावले आहे. ‘हिटिंग सिझन’ संपल्याने उन्हाळ्याच्या काळात इंधनवायूच्या पुरवठ्याची टंचाई भासणार नाही, मात्र हिवाळ्यासाठी इंधनाचा साठा करण्याची योजना कोलमडू शकते, असे ऊर्जा यंत्रणेचे प्रमुख क्लॉस मुलर यांनी बजावले. रशियाने आतापर्यंत जर्मनीला इंधनवायुचा पुरवठा करण्याचे धोरण ठेवले होते, पण भविष्याची खात्री देता येणार नाही, अशी भीतीही मुलर यांनी व्यक्त केली.

जर्मनीच्या व्यतिरिक्त फ्रान्स, इटली व ऑस्ट्रियाच्या इंधनकंपन्यांनीही रशियन इंधनवायुचा पुरवठा कमी झाल्याचे दावे केले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात रशिया युरोपिय देशांना करण्यात येणारा नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा रोखू शकतो, असे संकेत मिळत आहेत. यापूर्वी रशियाने बल्गेरिया, डेन्मार्क व फिनलँड यासारखा देशांचा इंधनपुरवठा बंद केला होता. त्यानंतर आता इतर देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा घटवून त्यांना मिळणारे रशियन इंधनही बंद होऊ शकते, असा इशारा रशिया देत आहे. युरोपिय देशांनी युक्रेनला दिलेले समर्थन व रशियावर लादलेले निर्बंध ही त्याची प्रमुख कारणे असल्याचे दिसते.

रशियाने जर्मनीचा इंधनपुरवठा घटविल्याने युरोपिय इंधनबाजारपेठेत खळबळ उडाली आहे. गुरुवारी युरोपातील इंधनवायूचे दर कडाडून प्रति हजार घनमीटरमागे 1500 डॉलर्सवर पोहोचले. नजिकच्या काळात त्यात अजून वाढ होण्याचे भाकित विश्लेषकांनी वर्तविले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info