मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील मोक्याचे शहर असलेल्या सेव्हेरोडोनेत्स्कवर नियंत्रण मिळविल्यानंतर रशियाने आपले लक्ष खार्किव्हकडे वळविले आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या खार्किव्हवर नवे हल्ले सुरू झाल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. नजिकच्या काळात खार्किव्ह ही रशिया-युक्रेन युद्धातील नवी आघाडी ठरेल, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बजावले आहे. दरम्यान, पाश्चिमात्य नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते असा दावा केला आहे. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासंदर्भात वक्तव्य केल्याचे समोर आले.
गेल्या काही आठवड्यात रशियाला युक्रेन युद्धात चांगले सामरिक यश मिळाले आहे. युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रात रशियाने चांगली आघाडी घेतली असून सेव्हेरोडोनेत्स्कसारखे मोक्याच्या शहरावर जवळपास पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या ॲझोट फॅक्टरी परिसरात युक्रेनी लष्करी तुकडीने आश्रय घेतला आहे. हा भाग वगळता इतर भाग पूर्णपणे रशियन फौजांच्या ताब्यात आहे. सेव्हेरोडोनेत्स्कपाठोपाठ लिशिचान्स्क, बाखमत व स्लोव्हिआन्स्क या शहरांवरही रशियाने तीव्र हल्ले सुरू केले आहेत.
डोन्बासमध्ये ही आगेकूच सुरू असतानाच रशियाने आपले लक्ष आता खार्किव्हकडे वळविले आहे. युक्रेनवरील मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने हे शहर ताब्यात घेतले होते. मात्र काही काळाने त्यातून माघार घेणे भाग पडले होते. त्यानंतर काही काळ रशियाने या भागातील हल्ले थांबविले होते. मात्र आता डोन्बासमध्ये मिळत असलेल्या यशानंतर रशियाने आपले लक्ष पुन्हा खार्किव्हकडे वळविले आहे. गेल्या आठवड्यापासून रशियाने खार्किव्ह परिसरात तोफा तसेच रॉकेट्सचा मारा सुरू केला आहे.
रशियन लष्कराच्या काही तुकड्या खार्किव्हच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती रशियन संरक्षणदलांकडून देण्यात आली. या हालचाली खार्किव्ह ताब्यात घेण्याच्या नव्या मोहिमेचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनी अधिकाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त केली. नजिकच्या काळात रशिया खार्किव्हला युद्धातील ‘फ्रंटलाईन सिटी’ बनवू शकते, अशी भीती युक्रेनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डोन्बास व दक्षिण युक्रेनमध्ये धक्के बसत असतानाच खार्किव्हवरील रशियाचे हल्ले युक्रेनी लष्करासमोरील संकटात भर टाकणारे ठरतील, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रशियाने मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात कॅलिबर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविल्याची माहिती दिली. यात परदेशी शस्त्रसाठ्यासह युक्रेनी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचे संरक्षणदलांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षांपर्यंत लांबण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ‘युक्रेनमधील युद्ध किती काळ चालेल हे कोणालाच माहित नाही. आपल्याला अनेक वर्षांसाठी तयारी करावी लागणार आहे’, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही याला दुजोरा दिला. युक्रेनच्या सहकारी देशांना दीर्घकालिन युद्धासाठी सज्ज रहावे लागेल, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी बजावले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |