युक्रेनमधील लुहान्स्क प्रांत रशियाच्या पूर्ण नियंत्रणाखाली

- रशियन संरक्षणमंत्र्यांची माहिती

लुहान्स्क

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क हा प्रांत पूर्णपणे रशियन लष्कराच्या नियंत्रणाखाली आल्याची माहिती रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत संरक्षणमंत्री शोईगु यांनी ही माहिती दिल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी रशियन लष्कराने लुहान्स्कमधील निर्णायक मानल्या जाणाऱ्या लिशिचान्स्क शहरावर ताबा मिळविल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर, रशियाने लुहान्स्कवरील नियंत्रणाबाबत दिलेली माहिती महत्त्वाची ठरते.

दोन महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याची घोषणा केली होती. या टप्प्यात खार्किव्हपासून ते ओडेसापर्यंतच्या भागावर नियंत्रण मिळविण्याची योजना असल्याचा दावा रशियाच्या एका वरिष्ट लष्करी अधिकाऱ्याने केला होता. यात युक्रेनच्या ‘डोन्बास’ क्षेत्रावरील ताब्याला प्राधान्य असेल असे संकेत रशियन सूत्रांनी दिले होते. त्यानंतर गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियन संरक्षणदलांनी आपल्या हल्ल्याची तीव्रता जबरदस्त प्रमाणात वाढविली होती.

लुहान्स्क

डोन्बास क्षेत्रात लुहान्स्क व डोनेत्स्क या दोन प्रांतांचा समावेश होतो. या प्रांतांमधील काही भाग रशिया समर्थक गटांनी 2014 सालीच ताब्यात घेतला होता. मात्र रशियन लष्कराने गेल्या दीड महिन्यात या क्षेत्रातील मोठा भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. यासाठी तोफा, रणगाडे, रॉकेट्स, क्षेपणास्त्रे तसेच हवाईहल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. लुहान्स्क प्रांतावरील ताब्यासाठी सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क या दोन शहरांमध्ये झालेली लढाई निर्णायक ठरली. लुहान्स्कवरील ताबा हा रशियन संरक्षणदलाच्या कारवाईसाठी निर्णायक टप्पा ठरु शकतो, असे संकेत देण्यात येत आहेत.

लुहान्स्क

लुहान्स्कवरील ताब्यानंतर रशियाने डोनेत्स्क प्रांतातील स्लोव्हियान्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमत या शहरांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. डोनेत्स्कवरील ताब्यासाठी या तीन शहरांवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येते. मात्र या तिन्ही शहरांसाठीची लढाई लुहान्स्कवरील ताब्याइतकी सहज असणार नाही, असे युक्रेनी अधिकाऱ्यांनी बजावले आहे. युक्रेनी फौजा परदेशी शस्त्रसहाय्याच्या बळावर रशियन संरक्षणदलांना अधिक काळ रोखून धरण्यात यशस्वी ठरतील, असे युक्रेनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनने रशियाच्या हद्दीतील शहरांवर हल्ले सुरू केल्याचे समोर येत आहे. रशियाच्या बेलगोरोद शहरात युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ला चढविल्याचा दावा रशियन सूत्रांनी केला. या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रशियन शहरावरील हल्ल्याचे वृत्त समोर येत असतानाच बेलारुसने युक्रेनचा क्षेपणास्त्रहल्ला परतविल्याचा दावा केला आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info