मॉस्को/किव्ह – युक्रेनी लष्कराने रशियाच्या ताब्यात असलेल्या दक्षिण युक्रेनमधील खेर्सन प्रांतात हल्ले सुरू केले. मायकोलेव्ह तसेच नोव्हा खाकोव्का या भागांमध्ये हेलिकॉप्टर्स तसेच रॉकेट्सच्या सहाय्याने मारा केल्याची माहिती युक्रेनच्या ‘ऑपरेशनल कमांड साऊथ’ने दिली. युक्रेनच्या हल्ल्यात सहा नागरिकांचा बळी गेला असून 80 जण जखमी झाल्याचा दावा रशियाने केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रशियाकडून डोनेत्स्कमधील हल्ले तीव्र झाल्याची कबुली युक्रेनने दिली आहे.
गेल्या काही दिवसात युक्रेनच्या नेतृत्त्वाकडून सातत्याने दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या भागांवर प्रतिहल्ले करण्याबाबत इशारे दिले जात होते. त्यासाठी युक्रेन ‘मिलियन स्ट्राँग आर्मी’ सज्ज करीत असल्याचा दावाही करण्यात आला होता. अमेरिका व युरोपिय देशांकडून मिळालेल्या शस्त्रांच्या बळावर युक्रेनी लष्कर रशियाच्या ताब्यात गेलेला भूभाग परत मिळवेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बजावले होते. युक्रेनी फौजांनी त्यासाठी कारवाई सुरू केल्याचे खेर्सनमध्ये झालेल्या हल्ल्यांमधून समोर आले.
मायकोलेव्हमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या भागातील शस्त्रांच्या कोठारांना लक्ष्य केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. त्याचवेळी युक्रेनच्या हेलिकॉप्टर्सनी खेर्सनमधील रशियन तळांवर हल्ले केले. खेर्सनमधील नोव्हा खाकोव्कामध्ये स्टोरेज डेपोसह अनेक घरांना युक्रेनने लक्ष्य केले. यात सहा जणांचा बळी गेला असून 80 जण जखमी झाल्याची माहिती रशियाने दिली. युक्रेनने रशियाच्या ताब्यातील भागावर चढविलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा करण्यात आला. या हल्ल्यांसाठी युक्रेनकडून अमेरिकेने दिलेल्या ‘हायमार्स’ रॉकेट सिस्टिमचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
युक्रेनच्या या प्रतिहल्ल्यांनी रशियाच्या डोन्बासमधील मोहिमेवर कोणताच फरक पडलेला नाही. उलट रशियाकडून डोनेत्स्क प्रांतातील हल्ले अधिक तीव्र होत असल्याची कबुली युक्रेनकडून देण्यात आली. रशियन रणगाडे, तोफा, रॉकेट्स व क्षेपणास्त्रे डोनेत्स्कमधील वस्त्यांना अक्षरशः भाजून काढत असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. डोनेत्स्कव्यतिरिक्त खार्किव्ह शहरावरदेखील रशियन फौजांनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रशियन फौजांचा खार्किव्हनजिकचा काही भाग ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचा दावाही करण्यात येतो. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला.
दरम्यान, रशियन संरक्षण विभागाकडून नौदलासाठी नवे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात येत असल्याचे वृत्त ‘तास’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. ‘झ्मिविक’ असे नाव असलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार किलोमीटर्सचा असून त्यात मोठ्या युद्धनौकांना लक्ष्य करण्याची क्षमता असेल, असा दावा सूत्रांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |