‘ग्रेन डील’नंतर रशियाचे ओडेसासह इतर भागांवर क्षेपणास्त्र हल्ले

ओडेसासह

मॉस्को/किव्ह – शुक्रवारी तुर्कीत पार पडलेल्या ‘ग्रेन एक्सपोर्ट डील’नंतर काही तासातच रशियाने युक्रेनचे आघाडीचे बंदर असलेल्या ओडेसासह किरोवोहरॅड प्रांतांवर जोरदार क्षेपणास्त्रहल्ले चढविले. युक्रेनसह संयुक्त राष्ट्रसंघटना व अमेरिकेने या हल्ल्यांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. या हल्ल्यांने रशियाच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे युक्रेनने म्हंटले आहे. काही विश्लेषक तसेच माध्यमांनी रशियाच्या हल्ल्यांनंतर अन्नधान्याच्या निर्यातीसंदर्भातील कराराची अंमलबजावणी अडचणीत येऊ शकते, असा दावा केला.

काही दिवसांपूर्वीच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनमधील लष्करी मोहिमेची उद्दिष्टे बदलल्याचे जाहीर केले होते. रशिया केवळ डोन्बास क्षेत्रच नाही तर त्यापलिकडील युक्रेनच्या भागांवर ताबा मिळवेल, असे लॅव्हरोव्ह म्हणाले होते. गेल्या काही दिवसांमध्ये रशियाकडून वाढलेले हल्ले त्याला दुजोरा देणारे ठरले आहेत. रशियन फौजा दक्षिण युक्रेनमध्ये मायकोलेव्ह व ओडेसा प्रांतांना सातत्याने लक्ष्य करीत आहे. त्याचवेळी मध्य युक्रेनमधील प्रांतांवरही रशियाने मारा सुरू केला आहे.

ओडेसा बंदर हे युक्रेनच्या ताब्यातील महत्वाचे बंदर आहे. रशियाच्या युद्धनौका ओडेसानजिकच्या सागरी क्षेत्रात तैनात असल्याने या बंदरातील व्यापारासह इतर व्यवहार सध्या ठप्प आहेत. ओडेसासह इतर बंदरांवरील व्यापार व इतर व्यवहार सुरू करण्यासाठी युक्रेनने रशियाबरोबरील धान्य निर्यात कराराला मान्यता दिली आहे. मात्र रशियाच्या लष्करी मोहिमेत ओडेसावरील नियंत्रण हादेखील महत्त्वाचा घटक असल्याने त्यावर ताबा मिळविण्यासाठी हल्ले सुरू राहतील, असे संकेत रशियाच्या नव्या हल्ल्यातून मिळत आहेत.

रशियाने ओडेसावर कॅलिबर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे समोर आले आहे. या माऱ्यात ओडेसा बंदरातील काही मालमत्तांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. ‘ग्रेन डील’मध्ये ओडेसाचा समावेश असतानाही रशियाने ओडेसावर हल्ला करणे हे निंदनीय कृत्य असल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी केली. अमेरिकेच्या युक्रेनमधील राजदूत ब्रिजेट ब्रिंक यांनीही नाराजी व्यक्त करून अन्नधान्याचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्या रशियाला त्यासाठी जबाबदार धरायला हवे, अशी मागणी केली.

ओडेसापाठोपाठ रशियाने मध्य युक्रेनमधील किरोवोहरॅड प्रांतावरही क्षेपणास्त्रहल्ले केले. रशियाने 10 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला. यात विमानतळ तसेच वीजनिर्मिती केंद्राचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यांमध्ये युक्रेनी जवानांसह अनेकांचा बळी गेल्याची माहितीही स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. रशियाने उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह शहरावर हवाईहल्ले चढविल्याचेही समोर आले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info