किव्ह/मॉस्को – रशियाविरोधातील संघर्षात युद्धभूमीवरील परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली असून सप्टेंबर महिन्यापर्यंत युक्रेनी फौजा खेर्सन प्रांतावर पूर्ण ताबा मिळवतील, असा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. युक्रेनी फौजा आता बचावाऐवजी प्रतिहल्ले चढवित आहेत, असे खेर्सन प्रांतातील वरिष्ठ युक्रेनी अधिकारी सर्जिय ख्लान यांनी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वीच युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी, खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील मोठ्या कारवाईचा इशारा देऊन नागरिकांनी ताबडतोब या क्षेत्रातून स्थलांतर करावे, असे बजावले होते.
फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर खेर्सन हे पहिले मोठे शहर रशियाच्या ताब्यात आले होते. त्यानंतरच्या काळात रशियाने खेर्सन प्रांतातील जवळपास 90 टक्के भागावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. हा प्रांत रशियाने 2014 साली ताब्यात घेतलेल्या क्रिमिआ प्रांताला जोडून असल्याने रशियन मोहिमेच्या यशासाठी महत्त्वाचा मानला जातो. मायकोलेव्ह तसेच ओडेसावर ताबा मिळविण्यासाठी रशियाला हा प्रांत ताब्यात ठेवणे गरजेचे आहे.
दक्षिण युक्रेनमधील हा प्रांत युक्रेनमध्ये ‘फ्रूट बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून सागरी वाहतूक व व्यापारी निर्यातीत आघाडीवर आहे. त्यामुळे युक्रेनसाठीही हा प्रांत महत्त्वाचा ठरतो. रशियन फौजांविरोधात प्रतिहल्ल्याची योजना आखताना युक्रेनने या प्रांताची केलेली निवड त्याचे स्थान अधोरेखित करणारी ठरते. सध्याच्या काळात रशियाच्या लष्करी मोहिमेचे उद्दिष्ट डोन्बासभोवती केंद्रित झाले असल्याने सर्वाधिक तैनाती त्याच क्षेत्रात आहे. याचा फायदा घेऊन युक्रेनने या महिन्याच्या सुरुवातीपासून खेर्सनवर हल्ल्यांची व्याप्ती वाढविली होती.
दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनी फौजांनी खेर्सनमधील नोव्हा खाकोव्का भागात मोठा हल्ला चढविला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर खेर्सन शहर तसेच नजिकच्या भागात सातत्याने मारा सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या लष्करी हालचालींसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एक ब्रिजचे नुकसान करण्यातही युक्रेनचे लष्कर यशस्वी ठरले होते. एकापाठोपाठ मिळालेल्या या यशाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने अवघ्या दोन महिन्यात पूर्ण प्रांतावर ताबा मिळविण्याचा दावा केल्याचे दिसते. युक्रेनी दलांना मिळालेल्या या यशामागे परदेशी शस्त्रांचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. खेर्सनमधील हल्ल्यात अमेरिका तसेच ब्रिटनकडून मिळालेल्या यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, रशियाकडून डोन्बास क्षेत्रातील हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. स्लोव्हिआन्स्क, बाखमत व सिवेर्स्कनजिक रशियन फौजांकडून ‘ग्राऊंड ॲसॉल्ट’ सुरू असल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |