अमेरिकेच्या सभापतींनी तैवानला भेट दिल्यास चीन स्वस्थ बसणार नाही

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अमेरिकेला इशारा

बीजिंग/सिंगापूर – अमेरिकन सिनेटच्या सभापतींचा आशिया दौरा सुरू झाला असून त्यांच्या या दौऱ्यामुळे चीन अधिकच अस्वस्थ झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला पुन्हा एकदा लष्करी कारवाईची धमकी दिली. पेलोसी तैवानच्या भेटीवर जात असताना चीन स्वस्थ बसणार नाही, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. गेल्याच आठवड्यात चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने पेलोसी यांचे विमान पाडण्याची धमकी दिली होती.

चीन स्वस्थ

अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी रविवारी उशीरा सिंगापूरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षा हलिमा याकूब आणि पंतप्रधान ली हिन लूंग यांची भेट घेतली. यानंतर पेलोसी अमेरिकेचा सहकारी देश दक्षिण कोरिया व जपानलाही भेट देणार आहेत. पण आपल्या या आशिया दौऱ्यात पेलोसी तैवानला जाणार का? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पेलोसी यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिलेली नाही.

पण पेलोसी यांचा तैवान दौरा हा जवळपास निश्चित असल्याचा दावा अमेरिका तसेच तैवानमधील माध्यमे करीत आहेत. मंगळवारी रात्री पेलोसी तैवानची राजधानी तैपेईमध्ये दाखल होतील, असे तैवानच्या वृत्तवाहिन्या सांगत आहेत. तर अमेरिकेने देखील तैवानच्या सागरी क्षेत्रात आपली अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ तसेच लढाऊ विमाने रवाना करण्यासाठी हालचाली वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. तर पॅसिफिक महासागराच्या हवाई बेटांजवळ सुरू असलेल्या ‘रिमपॅक’ युद्धसरावात सहभागी झालेली अमेरिकेची ‘युएसएस अब्राहम लिंकन’, ॲम्फिबियस युद्धनौका ‘युएसएस एसेक्स’ देखील सज्ज असल्याचे दावे केले जातात.

चीन स्वस्थ

या बातम्यांना दुजोरा मिळालेला नाही. पण यामुळे चीनची बेचैनी वाढल्याचे दिसत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी पेलोसी यांच्या संभाव्य तैवान भेटीवरुन अमेरिकेला लष्करी कारवाईचा इशारा दिला. अमेरिकन राजकारणात तिसऱ्या क्रमांकाच्या नेत्या, सिनेट सभापती तैवानच्या भेटीवर जात असताना चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी दिला. चीनच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे लिजियान यांनी बजावले. ‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘वन चायना पॉलिसी’ व चीनबरोबरच्या अन्य तीन करारांचे पालन केले आणि तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांचे समर्थन करणे सोडून दिले, तर ते अमेरिकेच्या हिताचे ठरेल’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकावले. गेल्या आठवड्याभरात पेलोसी यांच्या संभाव्य तैवान भेटीवरुन चीनने बायडेन प्रशासनाला चौथ्यांदा धमकावले आहे.

गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर फोनवरुन केलेल्या चर्चेतही अमेरिकेने ‘आगीशी खेळू नये’, असे बजावले होते. तर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने जाहीररित्या पेलोसी यांचे लष्करी विमान अथवा हेलिकॉप्टर रॉकेट हल्ला चढवून पाडण्याचा इशारा दिला होता. याला काही तास उलटत नाही तोच, चीनच्या लष्करातील ‘ऐटीथ ग्रुप आर्मी’ने वायबो या चिनी सोशल मीडियावर ‘युद्धासाठी सज्ज रहा’, असा संदेश प्रसिद्ध केला होता. चिनी लष्कराच्या या पोस्टला लाखो जणांनी लाईक्स दिल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने केला होता. तसेच पेलोसी यांच्या या दौऱ्यामुळे तैवानचे चीनमधील विलनीकरण सोपे होईल, असा इशारा ग्लोबल टाईम्स देत आहे.

तर सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेच थेट अमेरिकेला लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. त्यातच अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांच्या तैनातीच्या बातम्या देखील लक्षवेधी ठरत आहेत. दरम्यान, चीन तैवानवर हल्ला चढविण्याची संधी शोधत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला होता.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info