जवाहिरीच्या हत्येनंतर अल कायदा अमेरिकेवर मोठा हल्ला चढविल

- एफबीआयच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याला ठार करण्यात यश मिळाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. आता जवाहिरीपासून जगाला कोणताही धोका संभवत नसल्याचा दावा बायडेन यांनी केला होता. पण अमेरिकेच्या मुख्य तपास यंत्रणेचे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी जवाहिरीच्या हत्येनंतर अल कायदा अमेरिकेवर मोठा हल्ला चढविल, असा इशारा दिला आहे. अल कायदा प्रमाणे आयएस या दहशतवादी संघटनाही अमेरिकेत भीषण हल्ले घडवू शकते, असे एफबीआयच्या प्रमुखांनी सिनेटसमोरील सुनावणीत स्पष्ट केले

मोठा हल्ला अल कायदागेल्या रविवारी अमेरिकेच्या रिपर ड्रोनने अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील शिरपूर भागात हल्ला चढविला होता. हेलफायर क्षेपणास्त्राने चढविलेल्या या हल्ल्यात जवाहिरी ठार झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली होती. ओसामा बिन लादेन याच्यानंतर अल कायदाचे नेतृत्व करणारा जवाहिरी ठार झाल्यामुळे या दहशतवादी संघटनेला जबर हादरा बसल्याचा दावा बायडेन यांनी केला होता. अमेरिकेतील सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅट्सने जवाहिरीवरील कारवाईचे स्वागत केले होते. पण अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा याबाबत वेगळीच माहिती देत आहेत.

अमेरिकेची मुख्य तपास यंत्रणा ‘एफबीआय’चे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी सिनेटच्या चौकशीसमोर दिलेल्या माहितीत, जवाहिरी ठार झाल्यानंतरही अल कायदा अमेरिकेत हल्ले चढवू शकते किंवा हल्ल्यांसाठी चिथावणी देऊ शकते, असे म्हटले आहे. जवाहिरी ठार झाल्यामुळे काही काळासाठी अल कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करील किंवा पूर्व आणि पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये छोटे हल्ले घडविल, असा इशारा रे यांनी दिला. त्याचबरोबर गेल्या वर्षी बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानातून घाईगडबडीत घेतलेल्या सैन्यमाघारीला एफबीआयच्या प्रमुखांनी लक्ष्य केले.

अल कायदा

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीमुळे अमेरिकेचे गोपनीय माहिती पुरविणाऱ्यांचे जाळे (नेटवर्क) नष्ट झाल्याचे रे म्हणाले. यामुळे अफगाणिस्तानातून गोपनीय माहिती मिळविण्यात मोठ्या अडचणी येत असल्याची कबुली एफबीआयच्या प्रमुखांनी दिली. त्याचबरोबर अमेरिकेचे जवान तैनात नसल्यामुळे अल कायदा आणि आयएस या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात पुन्हा उभ्या राहतील, असा दावा रे यांनी केला. असे झाले तर या दहशतवाद्यांना अमेरिकेवर हल्ला चढविण्यासाठी उद्युक्त केले जाईल, असा इशारा रे यांनी दिला. अमेरिकेतील लोन वुल्फ अर्थात एकांडे दहशतवादी असे हल्ले चढवू शकतात, अशी शक्यता एफबीआयच्या प्रमुखांनी व्यक्त केली.

दरम्यान, गेल्या वर्षी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबरोबर अमेरिकेत दाखल झालेल्या अफगाणी निर्वासितांच्या लोंढ्याबाबतही अमेरिकेच्या चौकशी समतीने प्रश्न उपस्थित केले. गेल्या वर्षी कुठल्याही सुरक्षा तपासणीशिवाय 80 हजारांहून अधिक अफगाणींना अमेरिकेत आणले गेले. यापैकी किमान 50 अफगाणी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तपासातून उघड झाले होते. तर 324 अफगाणी अमेरिकी संरक्षण विभागाच्या ‘वॉचलिस्ट’वर असल्याचा दावा केला जातो.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info