मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या खार्किव्ह प्रांतातील काही भागांमधून रशियन लष्कराने माघार घेतल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुतिन यांचे समर्थक असलेले चेचेन नेते रमझान कादिरोव्ह यांनी, रशियन लष्कराकडून चुका झाल्या असून त्या लवकरच सुधाराव्या लागतील, असे बजावले. तर माजी वरिष्ठ गुप्तचर अधिकारी इगोर गिर्किन यांनी, खार्किव्हमधील माघारीची तुलना १९०५ सालातील रशियन पराभवाशी केली आहे. दरम्यान, खार्किव्हमधील माघारीनंतर रशियन संरक्षणदलांनी या क्षेत्रात पुन्हा क्षेपणास्त्रहल्ले केल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसात ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात युक्रेनी फौजांना मोठे सामरिक यश मिळाल्याचे दावे समोर आले होते. युक्रेनच्या फौजांनी इझियम शहरासह काही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्याचा व युक्रेनचे लष्कर रशियन सीमेपासून काही किलोमीटर्सच्या अंतरावर पोचल्याची माहिती युक्रेनी नेत्यांनी दिली होती. सुरुवातीला यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या रशियाच्या संरक्षण विभागाने रविवारी माघारीबद्दल निवेदन दिले होते. त्यात, डोन्बास क्षेत्रातील लष्करी मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खार्किव्हमधील काही भागांमधून माघार घेण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला होता.
मात्र या खुलाशावर रशियातील पुतिन समर्थक नेते व विश्लेषक नाराज असल्याचे समोर आले. चेचेन नेते कादिरोव्ह यांनी, रशियन संरक्षणदलांनी धोरण बदलण्याची गरज असल्याची उघड मागणी केली. असे झाले नाही तर आपण स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेऊन त्यांना वास्तवाची जाणीव करुन देऊ, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. त्याचवेळी आपल्याकडे अशा स्थितीत संघर्ष करण्यासाठी १० हजारांहून अधिक जवानांचे दल सज्ज असल्याचा दावाही त्यांनी केला. खार्किव्हमधील माघारीला रशिया प्रत्युत्तर देईल व रशियन लष्कर लवकरच ओडेसाही काबीज करेल, असा इशाराही चेचेन नेते कादिरोव्ह यांनी दिला.
२०१४ साली डोन्बास क्षेत्रातील संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या इगोर गिर्किन यांनी खार्किव्हमधील माघारी मोठे अपयश असल्याचा दावा केला. १९०५ साली रशिया-जपान युद्धादरम्यान रशियाला ‘बॅटल ऑफ मुकडेन’मध्ये पराभव पत्करावा लागला होता. या युद्धातील पराभवानंतर रशियात क्रांतीची बीजे रोवली गेली होती, याची आठवण गिर्किन यांनी करून दिली. खार्किव्हमधील माघारी याची पुनरावृत्ती करणारी घटना ठरेल, असा इशारा गिर्किन यांनी दिला. रशियातील पुतिन समर्थक मिलिटरी ब्लॉगर ‘रायबर’ याने खार्किव्हमधील माघारी जबरदस्त धक्का असल्याचे म्हटले आहे. पुतिन समर्थक विश्लेषक व नेत्यांनी आता युद्धाची घोषणा करून देशपातळीवर लष्करी जमवाजमव सुरू करायला हवी, अशी आक्रमक मागणी केली.
दरम्यान, खार्किव्हमधील काही शहरांमधून माघार घेणाऱ्या रशियाने पुन्हा या भागात नवे हल्ले केले आहेत. खार्किव्हसह सुमी व इतर भागांमधील वीजकेंद्रे तसेच पाण्याचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या अनेक शहरांना ‘ब्लॅकआऊट’ला सामोरे जावे लागले असून काही प्रांतांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |