मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनमधील चार प्रांतांच्या विलिनीकरणाची घोषणा करीत असतानाच डोन्बास क्षेत्रात रशियाला नवा धक्का बसला आहे. डोनेत्स्क प्रांतातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या लिमनमधून रशियन लष्कराला माघार घ्यावी लागली. युक्रेनच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ही माघार घेणे भाग पडल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या संरक्षण विभागाने माघारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्याच महिन्यात रशियाला ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह शहरासह प्रांतातून माघार घेणे भाग पडले होते. ही माघार रशियाचा मोठा पराभव असल्याचा दावा युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी केला होता. पण त्यानंतर रशियाने युक्रेनच्या विविध भागांवरील हल्ले अधिक तीव्र केले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुहल्ल्याचा इशाराही दिला होता व तो पोकळ नसल्याचेही बजावले होते. या पार्श्वभूमीवर लिमनमधील माघारीचे वृत्त लक्ष वेधून घेणारे ठरते.
लिमन हे डोनेत्स्क प्रांतातील शहर असून सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या शहरातून लुहान्स्क तसेच खार्किव्ह या दोन्ही प्रांतांवर हल्ले केले जाऊ शकतात. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मे महिन्यात रशियन फौजांनी या शहरावर ताबा मिळविला होता. खार्किव्हमध्ये मिळालेल्या यशानंतर युक्रेनी लष्कराने डोन्बास क्षेत्रात हल्ले करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गेले दोन आठवडे युक्रेनी फौजांकडून डोनेत्स्क प्रांतातील विविध भागांवर हल्ले सुरू झाले होते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी डोन्बाससह क्रिमिआवर ताबा मिळविल्याशिवाय युक्रेनी फौजा थांबणार नाहीत, असा इशाराही दिला होता.
त्यानंतर लिमनसारखे महत्त्वाचे शहर ताब्यात येणे युक्रेनसाठी मोठे यश मानले जाते. या ताब्यानंतर युक्रेनचे लष्कर रशियाच्या ताब्यात असलेल्या लुहान्स्क प्रांताकडे मोर्चा वळविल, असे सांगण्यात येते. रशियाच्या संरक्षण विभागाने लिमनमधील माघारीला दुजोरा दिला असला तरी त्याचवेळी युक्रेनचे 200 हून अधिक जवान मारल्याचाही दावा केला आहे. त्याचवेळी लिमनमधील माघारीनंतर डोन्बासच्या इतर क्षेत्रातील तैनाती वाढविण्यात येत असल्याचेही म्हटले आहे.
पाश्चिमात्य माध्यमांनी पुतिन यांच्या युक्रेनी प्रांतांच्या विलिनीकरणाच्या घोषणेनंतर लगेचच लिमनचा ताबा सोडावा लागणे ही मोठी घटना असल्याचा दावा केला आहे. विलिनीकरणाची घोषणा ही रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची व मोठी बाब ठरते. या पार्श्वभूमीवर लिमनची माघारी पुतिन यांच्या योजनांना धक्का देणारी ठरु शकते, असे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे. लिमनची माघारी पुतिन यांच्या समर्थकांना नाराज करणारी ठरेल व ते त्यांच्यावरील दडपण वाढवतील, असा दावाही विश्लेषकांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |