रशियाच्या ताब्यातील चार युक्रेनी प्रांतांमध्ये ‘मार्शल लॉ’ची घोषणा

- खेर्सन प्रांतातून हजारो नागरिकांचे स्थलांतर

मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये ‘मार्शल लॉ’ची घोषणा केली. रशियात पार पडलेल्या सिक्युरिटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युक्रेनी प्रांतांमध्ये मार्शल लॉ लागू होत असतानाच युक्रेनच्या सीमेला जोडून असलेल्या आठ रशियन प्रांतांमध्येही काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचवेळी खेर्सन प्रांतातील प्रखर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

‘मार्शल लॉ’ची घोषणा

गेल्या काही दिवसात रशियाकडून राजधानी किव्हसह युक्रेनच्या विविध प्रांतांमध्ये जोरदार क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील वीज तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रशियाने गेल्या आठवड्यात सुरू केलेले हे हल्ल्यांचे सत्र अद्याप थांबले नसून बुधवारीही क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा मारा करण्यात आला. राजधानी किव्हसह मध्य तसेच उत्तर युक्रेनमधील भागांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये युक्रेनची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची कबुली युक्रेनी नेतृत्त्वाकडून देण्यात आली आहे.

‘मार्शल लॉ’ची घोषणा

रशियाचे हे हल्ले सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी सिक्युरिटी कौन्सिलची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये ‘मार्शल लॉ’ लागू करीत असल्याचे जाहीर केले. डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ या चारही प्रांतांना रशियन कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचे असल्याने या भागांमध्ये मार्शल लॉची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. गुरुवार 20 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होईल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.

मार्शल लॉ लागू केल्यानंतर रशियन फौजा व सुरक्षायंत्रणा या भागावरील आपली पकड अधिक घट्ट करु शकतील, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. या प्रांतातील जनतेच्या हालचालींवर निर्बंध टाकण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. लुहान्स्क प्रांत वगळता इतर प्रांतांमधील काही भागांमध्ये युक्रेनचे नियंत्रण असून युक्रेनी फौजांकडून प्रतिहल्लेही सुरू आहेत.

‘मार्शल लॉ’ची घोषणा

खेर्सन प्रांतात या प्रतिहल्ल्यांची तीव्रता वाढली असून रशियन अधिकाऱ्यांनीही त्याची कबुली दिली. हल्ले वाढल्याने खेर्सनमधील सुमारे 60हजार नागरिकांना स्थलांतरित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रशियन यंत्रणा खेर्सनमधील नागरिकांवर दडपण आणत असल्याचा आरोप युक्रेनी यंत्रणांनी केला आहे.

दरम्यान, रशियन फौजांना डोनेत्स्क तसेच खार्किव्ह प्रांतात नवे भाग ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात रशियन लष्कराला खार्किव्हमधून पूर्ण माघार घ्यावी लागली होती. मात्र माघारीनंतरही रशियाने या क्षेत्रातील हल्ले सुरू ठेवले होते. मंगळवारी रशियाने खार्किव्ह सीमेवरील एक गाव त्ााब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. तर डोन्बास क्षेत्रात रशियन फौजांनी सोलेदारच्या दिशेने आगेकूच केल्याचे रशियन संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info