हॅलिफॅक्स/मॉस्को – ‘रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हे हुकुमशाही व अशांततेने भरलेले जग कसे असेल याची झलक दाखविते. अशा जगात राहणे आपल्यापैकी कोणालाच आवडत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अण्वस्त्रांच्या प्रसाराचे सावट असून युक्रेनचे युद्ध या प्रसाराला निमंत्रण ठरते. यामुळे जग अधिकच असुरक्षित होईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याप्रमाणेच निरंकुश सत्ता गाजविणारे जगभरातील हुकुमशहा रशिया-युक्रेन युद्धावर नजर ठेऊन आहेत. जर रशिया यशस्वी ठरला तर अण्वस्त्रे असलेल्या देशाला इतरांची शिकार करण्याचा परवाना मिळतो ही त्यांची भावना दृढ होईल. यातून अण्वस्त्रांसाठी जगात सुरू असलेल्या स्पर्धेला अधिकच वेग मिळेल’, असा गंभीर इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला.
कॅनडात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी, रशिया-युक्रेन युद्धावर आपली भूमिका मांडली. हा संघर्ष २१ व्या शतकाचे भवितव्य ठरविणारा संघर्ष असल्याचा दावा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी केला. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण जागतिक स्तरावर अस्तित्त्वात असलेल्या नियमांवर आधारित व्यवस्थेलाच आव्हान देणारे असल्याचे त्यांनी बजावले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आक्रमणाचा व युद्धाचा पर्याय निवडला असून ही बाब युरोपच्या सुरक्षेबरोबरच नाटोसाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले.
रशियाने जगाला सुरक्षित ठेवणारी नियमांवर आधारित असलेली व्यवस्था उद्ध्वस्त केली असून आपल्या सामायिक मूल्यांवर हल्ला चढविला आहे, असा दावा ऑस्टिन यांनी केला. पुतिन यांच्या युद्धामुळे युरोपसमोर दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट खडे ठाकले असल्याचा दावाही अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केला. रशियाच्या आक्रमकतेमुळे युरोपिय देश धास्तावले आहेत, असे सांगतानाच अमेरिका किंवा नाटो या युद्धात खेचले जाणार नसल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. अमेरिका व नाटो युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील व नाटो सदस्य देशांची एक इंच भूमीही रशियाच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी यावेळी दिला. रशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनला अधिकाधिक यश मिळत गेल्यास रशियाकडून पुन्हा आण्विक धमक्यांचे सत्र सुरू होऊ शकते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी रशिया व चीनची मैत्री आणि चीनकडून तैवानवरील हल्ल्यांसाठी सुरू असलेल्या तयारीचाही उल्लेख केला. अमेरिका व सहकारी देशांनी युक्रेनच्या संघर्षातून धडा घेतला असून चीनला रोखण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक’मधील देशांना अधिकाधिक सहाय्य पुरविण्यात येत असल्याकडेही अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. इराण व उत्तर कोरियासारखे देश रशियाला करीत असलेल्या सहाय्यावरही ऑस्टिन यांनी यावेळी टीकास्त्र सोडले.
रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या न्यूक्लिअर फोर्सेसना ॲलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नव्या अण्वस्त्राची चाचणी तसेच आण्विक सराव आयोजित करून रशियाची आण्विक सज्जताही दाखवून दिली होती. रशिया अण्वस्त्रांच्या बाबतीत करीत असलेली वक्तव्ये पोकळ नसल्याचा इशाराही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला होता. काही महिन्यांपूर्वी रशियात झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत युक्रेनविरोधात ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा वापर करण्यात यावा, अशी मागणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |