पॅरिस – रशियन फौजांनी 1812 व 1945 लढलेल्या युद्धांप्रमाणेच रशिया-युक्रेन संघर्ष देेखील ‘न्यू पॅट्रिऑटिक वॉर’ असल्याचे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी बजावले. युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी, युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्याचे समर्थन करताना रशियाला दीर्घकालिन युद्धे लढण्याचा अनुभव आहे, याची आठवण करून दिली होती. हा संदर्भ देऊन मेदवेदेव्ह यांनी रशियाला पराभूत करता येणे शक्य नाही, याचा पुनरुच्चार केला.
गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेसह युरोपिय देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही युक्रेनला अधिक शस्त्रांची गरज असल्याचे व शस्त्रपुरवठ्याचा ओघ कायम ठेवण्याची मागणी होत आहेत. युरोपातील काही नेत्यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल त्यापैकीच एक मानले जातात. युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यामागील कारणे सांगताना त्यांनी रशियाच्या इतिहासाचा दाखला दिला.
‘रशिया हा महान देशांपैकी एक असून त्याला अखेरपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याचा अनुभव आहे. जवळपास हरलेली युद्ध्े या देशाने कालांतराने जिंकून दाखविली आहेत. आताही रशिया युद्ध हरला आहे किंवा रशियाचे लष्कर अकार्यक्षम आहे, असे मानणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. रशिया युद्धात अपयशी ठरताना दिसत असला तरी त्याच्याकडे अजूनही लढण्याचे प्रचंड सामर्थ्य व क्षमता आहे’, याकडे बॉरेल यांनी लक्ष वेधले. रशियाच्या या क्षमतेमुळेच युक्रेनला पुढील काळात मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करीत राहणे गरजेचे आहे, असे महासंघाच्या परराष्ट्र प्रमुखांनी बजावले. रशियाच्या इतिहासाचा दाखला देताना त्यांनी 1812 साली नेपोलियनविरोधात झालेले युद्ध व 1941 साली दुसऱ्या महायुद्धात जर्मन हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरने केलेल्या आक्रमणाचा उल्लेख केला.
बॉरेल यांच्या या वक्तव्याचा आधार घेत रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी युक्रेनमधील संघर्ष म्हणजे ‘न्यू पॅट्रिऑटिक वॉरे’ असल्याचे बजावले. ‘बॉरेल यांनी रशियाने नेपोलियन व हिटलरला पराभूत केल्याचा उल्लेख केला. युक्रेनमधील नाझी व पश्चिम युरोपातील देश हे रशियाविरोधात यापूर्वी संघर्ष केलेल्यांचेच वारस आहेत. त्यामुळे 1812 व 1945 प्रमाणेच यावेळीही रशियाचाच विजय होईल’, असे मेदवेदेव्ह यांनी सांगितले.
दरम्यान, रशियाकडून डोन्बास व दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यात आल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली आहे. सोलेदारवर ताबा मिळविल्यानंतर रशियन फौजांनी बाखमतसाठी आगेकूच सुरू केली आहे. शनिवारी रशियन फौजांनी बाखमतजवळचा काही भाग ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. बाखमत मोहिमेसाठी रशियाने नवी तैनाती केल्याचे सांगण्यात येत असून त्याला तोंड देणे शक्य नसल्याचा सूर युक्रेनी लष्करातून व्यक्त होत आहे. डोन्बासपाठोपाठ दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआ प्रांतातही रशियाने नवे हल्ले सुरू केले आहेत. या प्रांतातील दोन शहरांच्या दिशेने रशियाने आगेकूच केल्याचे सांगण्यात येते.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |