युक्रेनचे युद्ध पेटवून देणारा अमेरिकाच याचा सर्वात मोठा लाभार्थी ठरतो

- रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांचा आरोप

मॉस्को – अमेरिका हाच युक्रेनचे युद्ध पेटवून देणारा व त्याचे लाभ उपटणारा देश आहे, असा आरोप रशियाचे उपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी केला. अमेरिकेच्या संरक्षण उद्योगाला युक्रेनच्या युद्धामुळे अनेकविध लाभ होत आहेत. यामुळे युक्रेनचे युद्ध पेटवून देणारा आणि त्याचा सर्वात मोठा लाभार्थी असलेला देश अमेरिकाच ठरतो. युक्रेनला रणगाडे पुरविण्याच्या तयारीत असलेले जर्मनीसारखे देश अमेरिकेच्या व्यूहरचनेचे प्यादे बनले आहेत, अशी टीका रिब्कोव्ह यांनी केली.

सर्वात मोठा लाभार्थी

अमेरिकेबरोबरच जर्मनी, ब्रिटन व फ्रान्स या देशांनीही युक्रेनला प्रगत रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे. तसे करून या देशांनी युक्रेनच्या युद्धात आपण सहभागी असल्याचे दाखवून दिले, असा आरोप रशियाने केला होता. तसेच रशियाने याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची तयारी देखील सुरू केली आहे. अशा परिस्थितीत जर्मनी तसेच इतर युरोपिय देशांना युक्रेनसाठी रणगाडे पुरविण्यास भाग पाडून अमेरिकेने या युद्धात युरोपिय देशांना खेचले आहे, अशा दावा रशियाचे उपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी केला.

युक्रेनचे युद्ध अमेरिकेनेच पेटविलेले आहे आणि अमेरिकाच या युद्धाचा सर्वात मोठा लाभार्थी आहे, असा ठपका ठेवून रिब्कोव्ह यांनी अमेरिकेवर तोफ डागली. युक्रेनच्या युद्धात अमेरिका आपण तयार केलेल्या नव्या शस्त्रास्त्रांचे प्रयोग करीत आहे. रशियाच्या विरोधात या शस्त्रास्त्रांच्या वापराच्या प्रयोगाबरोबरच, अमेरिका आपली जुनी झालेली शस्त्रास्त्रे देखील युक्रेनच्या गळ्यात मारत आहे, असा दावा सर्जेई रिब्कोव्ह यांनी केला. हे सारे लाभ मिळविण्यासाठी युक्र्रेनचे युद्ध ही अमेरिकेने अत्यंत योजनाबद्धरित्या घडवून आणलेली बाब ठरते, असा निष्कर्ष रिब्कोव्ह यांनी नोंदविलेला आहे.

सर्वात मोठा लाभार्थी

त्याचवेळी अमेरिका युक्रेनच्या लष्कराला पुरवित असलेल्या ‘अब्राहम’ रणगाड्यांचा युक्रेनला फायदा होणार नाही, असा टोला देखील रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी लगावला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण उद्योगाला युक्रेनच्या युद्धाचा मोठा लाभ मिळत असल्याची बाब रिब्कोव्ह यांनी लक्षात आणून दिली. मात्र युरोपिय देश अमेरिकेच्या या रशियाविरोधी डावपेचात प्याद्यासारखे काम करीत असल्याचे रिब्कोव्ह पुढे म्हणाले. मात्र अमेरिका आणि नाटोचे युक्रेनला या युद्धात सहाय्य पुरविण्याचे डावपेच यशस्वी ठरणार नाहीत, उलट ते घातक डावपेच या देशांवरच उलटतील, असा इशारा रशियन उपपरराष्ट्रमंत्र्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी देखील जवळपास याच शब्दात युक्रेनच्या युद्धाबाबत आपली भूमिका मांडली होती. अमेरिका आपल्या रशियाविरोधी डावपेच व लष्करी हितसंबंधांसाठी युरोपिय देशांचा वापर करीत असून ही बाब युरोपिय देशांसाठी घातक ठरेल, कारण युक्रेनच्या युद्धाचे थेट परिणाम अखेरीस युरोपिय देशांनाच सहन करावे लागतील, असा इशारा पंतप्रधान ऑर्बन यांनी दिला होता.

रशियाचे इतर नेते देखील युरोपिय देशांना अमेरिकेच्या या डावपेचांची जाणीव करून देत आहेत. युक्रेनला नाटोत सहभागी करून घेण्याच्या हालचाली अमेरिकेने केल्या नसत्या, तर रशियाने युक्रेनवर हल्ला चढविलाच नसता, ही बाब रशियाच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांबरोबरच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विश्लेषक देखील लक्षात आणून देत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info