वॉशिंग्टन – युक्रेनच्या युद्धातून अमेरिकेला तैवानच्या संरक्षणासाठी चीनबरोबर कराव्या लागणाऱ्या संभाव्य युद्धासाठी आवश्यक ते धडे मिळाले आहेत. या अनुभवाचा मोठा लाभ अमेरिकेला मिळेल. त्याचवेळी चीनबरोबरील या संभाव्य युद्धासाठी तयारी करण्यासाठी अमेरिकेला काही महिन्यांचा कालावधी लागू शकेल, ही धोकादायक बाब ठरते. युक्रेनचे युद्ध एकाएकी पेटले नाही, तर हळुहळू याची तीव्रता वाढत गेली. पण तैवानवरील चीनच्या आक्रमणानंतर पेटू शकणारे अमेरिका व चीनमधील युद्ध भडका उडाल्यासारखे पेट घेईल. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी अमेरिकेकडे पुरेसा वेळ नाही, याची जाणीव करून देणारा अहवाल ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज्-सीएसआयएस’ने प्रसिद्ध केला.
अमेरिका युक्रेनच्या युद्धात गुंतलेली आहे. युक्रेनी लष्करासाठी अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येत आहे. युक्रेनी लष्कर दिवसाकाठी सुमारे सात हजार तोफगोळे, रॉकेटस् व क्षेपणास्त्रांचा मारा रशियन सैन्यावर करीत आहे. युक्रेनी लष्कराकडून केल्या जाणाऱ्या तोफा व रॉकेट्सच्या भडीमारावर नाटोच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण स्वसंरक्षणासाठी युक्रेनला हा मारा करणे भाग पडत असल्याचा दावा ‘सीएसआयएस’ने केला.
अमेरिका युक्रेनी लष्कराला प्रचंड प्रमाणात तोफगोळे व इतर आवश्यक दारूगोळा पुरवित आहे. यामध्ये ८५०० जॅवलिन अँटी आर्म सिस्टीम, १६०० अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम व १२५ एमएम टँकसाठी लागणारे एक लाख तोफगोळ्यांचा समावेश आहे. याबरोबरच हॉवित्झर तोफांच्या एक लाखाहून अधिक तोफगोळ्यांचा पुरवठा अमेरिकेने युक्रेनला केलेला आहे. याचा फार मोठा ताण अमेरिकेच्या संरक्षणविषयक उत्पादनावर झालेला आहे. अशा परिस्थितीत चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास काय होईल, याची शक्यता ‘सीएसआयएस’च्या अहवालात मांडण्यात आली आहे.
चीनने तैवानवर हल्ला चढविला, तर तैवानला जोरदार प्रतिकार करून चीनच्या लष्कराला रोखावे लागेल. कारण तैवानला सहाय्य पोहोचविणाऱ्या मार्गाची चीनकडून आधीच कोंडी केली जाईल. त्यामुळे चीनचा वेढा पडेपर्यंत तैवान प्रतिक्षा करू शकत नाही, तैवानला त्याच्या आधीच चीनच्या लष्करावर हल्ला चढवावा लागेल, असा दावा ‘सीएसआयएस’ने केला. युक्रेनच्या युद्धातून मिळालेला अनुभव अमेरिकेला चीनबरोबर होऊ शकणाऱ्या या युद्धात उपयोगी ठरू शकतो. पण याची पूर्वतयारी करण्यासाठी अमेरिकेकडे फारसा ेअवधी राहिलेला नाही, याची जाणीव देखील सदर अहवालात करून देण्यात आलेली आहे. रशियाच्या विरोधात युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवित असताना, चीनने तैवानवर हल्ला चढविला, तर अमेरिकेला शस्त्रास्त्रांची कमतरता भासू शकते. तैवानच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली अमेरिका आपल्या लष्करासाठीच्या शस्त्रसाठ्याचा वापर करून चीनला प्रत्युत्तर देऊ शकेल, असेही सीएसआयएसने म्हटले आहे.
यासाठी अमेरिकेला जलदगतीने आक्रमक निर्णय घ्यावे लागतील, याची जाणीव सीएसआयएसने करून दिली. दरम्यान, युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेचे लक्ष पूर्णपणे या युद्धाकडे लागलेले असताना तैवानला चीनपासून असलेला धोका वाढल्याचे दावे केले जातात. चीन आकस्मिकरित्या हल्ला चढवून तैवानचा ताबा घेईल आणि त्यानंतर अमेरिका काहीही करू शकणार नाही, असे काहीजणांनी याआधीच बजावले होते. अशा परिस्थितीत ‘सीएसआयएस’ने दिलेल्या अहवालाचे महत्त्व वाढले आहे. पण चीन म्हणजे रशिया नाही आणि तैवान म्हणजे युक्रेन नाही, असे सांगून तैवानचे नेते व लष्करी अधिकारी या युद्धाचे परिणाम युक्रेनमधील युद्धापेक्षा खूपच वेगळे असतील, असा दावा करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |