मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरासाठी सुरू असलेल्या संघर्षात गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ४५० जवानांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. रशिया व युक्रेनच्या लष्कराने केलेल्या दाव्यांमधून ही माहिती समोर आली आहे. रशियन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, बाखमतमधील संघर्षात २१० युक्रेनी जवान ठार झाले आहेत. तर युक्रेनने केलेल्या दाव्यांनुसार२२०हून अधिक रशियन जवानांचा बळी गेला असून ३००हून अधिक जखमी झाले आहेत. पाश्चिमात्य यंत्रणा व इतर गटांनी प्रत्यक्षातील संख्या याहून अधिक असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाखमतवरील ताब्यासाठी सुरू असलेला संघर्ष अधिकच प्रखर झाला आहे. दरदिवशी शेकडो जवानांचे बळी जात असून युक्रेनची या शहरातील लष्करी ताकद व रसद दोन्ही संपत चालल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बाखमत म्हणजे पूर्व युक्रेनमधील भक्कम तटबंदी असल्याचा दावा करून ती अखेरच्या क्षणापर्यंत लढविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक इंचासाठी लढाई सुरू असून दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने मागे जाण्याचे संकेत दिलेले नाहीत.
रशियाकडून ‘वॅग्नर ग्रुप’सह हवाईदलाचे ‘ॲसॉल्ट युनिटस्’ बाखमतच्या संघर्षात उतरल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात बाखमत शहराच्या पूर्व भागावर ताबा मिळविल्याचा दावा ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी केला होता. त्याचवेळी आघाडी आम्ही जिंकून दाखवू, असेही त्यांनी बजावले होते. प्रिगोझिन यांच्या नव्या दाव्यानुसार, ‘वॅग्नर ग्रुप’ची पथके बाखमतच्या मध्यवर्ती केंद्रापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर पोहोचली आहेत. तर रशियन हवाईदलाच्या पथकांनी बाखमतच्या औद्योगिक केंद्राच्या भागात महत्त्वाच्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळविल्याचे सांगण्यात येते.
मीठ व जिप्समच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले बाखमत हे सामरिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले शहर म्हणून ओळखण्यात येते. पूर्व युक्रेनमधील अनेक शहरांना जोडणारे मार्ग बाखमतमधून जातात. त्यामुळे बाखमत रशियाच्या हाती पडल्यास पूर्व युक्रेनमधील या शहरांवर हल्ले करणे रशियासाठी काही प्रमाणात सोपे ठरु शकते. बाखमतवर ताबा मिळाल्यानंतर रशिया चॅसिव यार, स्लोव्हिआन्स्क व क्रॅमाटोर्स्क या शहरांवर हल्ले चढवू शकतो. परिणामी युक्रेनला डोनेत्स्क प्रांतासह डोन्बास क्षेत्रावरील नियंत्रण गमवावे लागू शकते, असे सांगण्यात येते. त्यामुळे रशिया व युक्रेन या दोन्ही बाजूंनी बाखमतची लढाई अत्यंत प्रतिष्ठेची बनविल्याचे दिसत आहे.
यापूर्वी गेल्या ऑगस्टमध्ये रशियन फौजांनी बाखमतवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश आले नव्हते. पण गेल्या दोन महिन्यात रशियाने बाखमतला प्राधान्य देत शहरातील बहुतांश भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. मात्र त्यानंतरचा संघर्ष अधिक तीव्र व प्रखर असल्याचे नव्या जीवितहानीवरून समोर आले आहे.
हिंदी