‘क्रेडिट स्यूस’ व ‘युबीएस’ या स्विस बँकांच्या विलीनीकरणानंतरही आंतरराष्ट्रीय शेअरबाजारातील पडझड कायम

- सोने दोन हजार डॉलर्सवर तर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण

बर्न/लंडन/वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय बँकांपैकी एक असलेल्या ‘युबीएस’ या स्विस बँकेने ‘क्रेडिट स्यूस’ ही प्रतिस्पर्धी बँक ताब्यात घेण्यास मान्यता दिली आहे. स्वित्झर्लंड सरकार व स्विस मध्यवर्ती बँकेच्या मध्यस्थीने यासंदर्भातील प्रस्तावावर एकमत झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. मात्र या विलीनीकरणानंतरही आंतरराष्ट्रीय शेअरबाजारातील पडझड कायम राहिली असून गुंतवणूकदारांची भीती दूर झाली नसल्याचे समोर आले. सोमवारी अमेरिका, युरोप व आशियातील प्रमुख शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली. त्याचवेळी कच्च्या तेलाचे दरही तीन टक्क्यांनी खाली आले आहेत. तर आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सोन्याच्या दरांनी प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर उसळी घेतली.

‘क्रेडिट स्यूस’

युरोपातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक असलेल्या ‘क्रेडिट स्यूस’ या बँकेला 2022 साली जवळपास आठ अब्ज डॉलर्सचा तोटा झाला होता. गेल्या महिन्यात ही माहिती उघड झाल्यानंतर बँकेचे समभाग घसरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात बँकेने आपल्या आर्थिक ताळेबंदात काही कमकुवत बाबी निदर्शनास आल्याचे जाहीर केले. ही माहिती उघड झाल्यावर बँकेत हिस्सा असणाऱ्या आघाडीच्या गुंतवणूकदारांनी अर्थसहाय्य करण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात बँकेचे समभाग तब्बल 25 टक्क्यांनी कोसळले.

‘क्रेडिट स्यूस’

एक लाख कोटी (लिियन) डॉलर्सहून अधिक निधीचे व्यवस्थापन, 550 अब्ज डॉलर्सहून अधिक मालमत्ता, 50 हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या ‘क्रेडिट स्यूस’चा समावेश जगातील 10 सर्वात मोठ्या बँकांमध्ये होते. ‘जी20’ गटाने स्थापन केलेल्या ‘फायनान्शिअल स्टॅबिलिटी बोर्ड’ यंत्रणेने या स्विस बँकेचा उल्लेख ‘ग्लोबली सिस्टेमेकली इम्पॉर्टंट बँक’ म्हणून केला आहे. या यादीत अमेरिका, युरोप व आशियातील 30 मोठ्या बँकांचा सहभाग आहे. या बँकांना ‘टू बिग टू फेल’ म्हणूनही ओळखण्यात येते. अशी पार्श्वभूमी असलेली स्विस बँक अडचणीत आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती.

‘क्रेडिट स्यूस’

कोरोनाची साथ व त्यानंतर सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे उडालेला महागाईचा भडका यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल, असे वारंवार बजावण्यात येत आहे. मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ‘क्रेडिट स्यूस’सारखी प्रचंड आकाराची बँक संकटात सापडणे जागतिक अर्थव्यवस्थेला अधिकच अडचणीत आणणारे ठरते. त्यामुळे स्विस सरकार व स्विस नॅशनल बँकेने तातडीने हस्तक्षेप करून ‘युबीएस’ या दुसऱ्या मोठ्या बँकेच्या सहाय्याने ‘क्रेडिट स्यूस’ला वाचविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

रविवारी करण्यात आलेल्या घोषणेनुसार, ‘युबीएस’ने 3.24 अब्ज डॉलर्स रक्कम मोजून ‘क्रेडिट स्यूस’चा ताबा घेतला आहे. प्राथमिक करारानुसार, स्विस नॅशनल बँक अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. त्याचवेळी क्रेडिट स्यूसमधील जवळपास नऊ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. ‘युबीएस’ व क्रेडिट स्यूसच्या विलीनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली आहे.

स्विस बँकिंग क्षेत्र हे कठोर नियम व गोपनीयतेसाठी ओळखण्यात येते. मात्र क्रेडिट स्यूसच्या अपयशाने याला धक्का बसला असून स्विस बँकिंगसह युरोपियन बँकिंगवरील विश्वास डळमळीत झाल्याचे संकेत मिळत आहेत. याचा फटका सोमवारी जगभरातील शेअरबाजारांना बसला. अमेरिका, युरोप व आशियातील शेअर निर्देशांकांमध्ये अर्ध्या टक्क्यापासून अडीच टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. सर्वाधिक फटका बँकांच्या समभागांना बसला असून क्रेडिट स्यूसचे समभाग 60 टक्क्यांहून अधिक कोसळले. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविण्यात आली. तर सोन्याच्या दरांमधील वाढ कायम असून सोमवारी झालेल्या व्यवहारांमध्ये दराने प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर उसळी घेतल्याचे समोर आले.

दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील सहा आघाडीच्या बँकांनी अर्थव्यवस्थेत अमेरिकी डॉलर्सचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी ‘स्वॅप लाईन’ची घोषणा केली. यापूर्वी 2008-09 साली आलेली मंदी व कोरोना साथीच्या काळात याचा वापर करण्यात आला होता. या ‘स्वॅप लाईन’मध्ये अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’सह युरोपियन सेंल बँक, बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ कॅनडा, बँक ऑफ जपान व स्विस नॅशनल बँकेचा समावेश आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info