मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतातील बाखमत शहराच्या ८० टक्क्यांहून अधिक भागावर ताबा मिळविल्यानंतर रशियाने या प्रांतातील इतर शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. रशियन फौजांकडून उगलेदर, चॅसिव यार व नजिकच्या क्षेत्रात जोरदार हल्ले सुरू असून त्यात जवळपास साडेचारशेहून अधिक युक्रेनी जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. तर युक्रेनने रशियाच्या सीमेवरील प्रांतांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी ब्रिआंस्क प्रांतात ड्रोनहल्ला झाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याभरात ब्रिआंस्कमध्ये युक्रेनने हल्ला करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांनी डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरावर ‘लीगल कंट्रोल’ मिळविल्याचा दावा केला होता. युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी हा दावा फेटाळला असला तरी बाखमतच्या ८० टक्क्यांहून अधिक भागावर रशियाचा ताबा असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी पोलंड दौऱ्यावर असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी परिस्थिती पाहून बाखमतचा निर्णय घेऊ, असे सांगून माघारीचे संकेत दिले होते.
बाखमतच्या संघर्षात युक्रेनला जवळपास १५ ते २० हजार जवान गमवावे लागल्याचा दावा रशिया समर्थक गटाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तर युक्रेनी फौजा दररोज रशियाने २० ते २५ हल्ले परतवून लावत असल्याचे दावे युक्रेनी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनी डोनेत्स्कमधील इतर शहरांवर ताबा मिळविण्यासाठी हल्ले सुरू केल्याचे गेल्या दोन दिवसातील लढाईवरून समोर येत आहे. रशियन फौजांकडून ॲव्हडिव्हका, उगलेदर, चॅसिव्ह यार व वोडिआनोयवर सातत्याने मारा सुरू आहे.
रशियाच्या या कारवाईत गेल्या २४ तासात साडेचारशेहून अधिक युक्रेनी जवान मारले गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. यावेळी युक्रेनी लष्कराचा शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आला. उगलेदरमधील हल्ल्यात रशियाची बॉम्बर्सही सहभागी झाल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त लुहान्स्क प्रांतातील कुपिआन्स्क व क्रेमिना आघाडीवर रशिया आणि युक्रेनच्या लष्करात जोरदार संघर्ष सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली.
रशियन लष्कराच्या हल्ल्यांमुळे जेरीस आलेल्या युक्रेनी लष्कराने रशियन प्रांतांमध्ये हल्ले चढविण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या महिन्यात रशियन यंत्रणांनी ब्रिआंस्कमध्ये मोठा हल्ला उधळल्याचा दावा केला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा ब्रिआंस्कमध्ये ड्रोनहल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ल्यात जीवितहानी झाली नसली तरी युक्रेनच्या वाढत्या हल्ल्यांमुळे रशियात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अशा प्रकारच्या हल्ल्यांमागे परदेशी गुप्तचर यंत्रणांचा सक्रिय हात असल्याचा आरोप केला होता.
यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘युक्रेनच्या हद्दीबाहेरील भागात हल्ले करण्यास अमेरिका कोणत्याही प्रकारचे सहाय्य अथवा प्रोत्साहन देत नाही’, असा खुलासा अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्त जॉन किरबाय यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |