मॉस्को/किव्ह – युक्रेनकडून मोठ्या प्रतिहल्ल्यांच्या तयारीचे दावे समोर येत असतानाच रशियाने आपले हल्ले अधिक प्रखर केल्याचे समोर येत आहे. गेल्या ४८ तासांमध्ये डोन्बास क्षेत्रात झालेल्या लढाईत युक्रेनच्या एक हजारांहून अधिक जवानांचा बळी गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. यात बाखमत, कुपिआन्स्क, लिमन व उग्लेदर शहरातील संघर्षाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनच्या नुकसानीचे वृत्त उघड होत असतानाच रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी, युक्रेनची राजवट पूर्ण खिळखिळी करून जबरदस्त लष्करी पराभव लादणे आवश्यक असल्याचे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने युक्रेनकडून रशियाविरोधात आखण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेसंदर्भात बातम्या तसेच अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहेत. युक्रेनने जवळपास ५० हजारांहून अधिक जवान व पाश्चिमात्यांकडून मिळालेली शस्त्रसामुग्री तसेच माहिती यांच्या जोरावर मोठी तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. हे दावे समोर येत असतानाच रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याचे दिसून येते.
एकीकडे डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरावरील आपली पकड रशियन फौजा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट करीत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला डोन्बास क्षेत्रातील सर्व भाग आपल्या ताब्यात आणण्यासाठी जबरदस्त हल्ल्यांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्याच आठवड्यात रशियन फौजांनी राजधानी किव्हसह युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले करून आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर गेल्या ४८ तासांच्या अवधीत रशियन फौजांनी युक्रेनी लष्कराच्या एक हजाराहून अधिक जवानांना ठार केल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली.
शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांमध्ये रशियन फौजांनी डोन्बास क्षेत्रातील विविध भागांना लक्ष्य केले. यात बाखमत, कुपिआन्स्क, लिमन व उग्लेदर आणि नजिकच्या भागांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या संघर्षात युक्रेनचे ५७५ जवान व परदेशी कंत्राटी जवानांचा बळी गेला. तर शनिवारी केलेल्या हल्ल्यांमध्ये ४८०हून अधिक युक्रेनी जवान तसेच कंत्राटी जवान ठार झाल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले. या हल्ल्यांमध्ये रणगाडे, तोफा, हॉवित्झर्स, सशस्त्र वाहने, रडार व ड्रोन्सही नष्ट करण्यात आल्याचे रशियन प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. तर रविवारी सकाळी खार्किव्ह प्रांतात रशियाने रॉकेटस्चा मारा केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला.
रशियन संरक्षण विभागाकडून युक्रेनच्या जीवितहानीची माहिती देण्यात येत असतानाच माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी युक्रेनच्या राजवटीविरोधात आक्रमक वक्तव्य करून लक्ष वेधले आहे. ‘युक्रेनच्या राजवटीच्या सर्व योजना उधळायच्या असतील तर प्रतिहल्ल्यांदरम्यान त्यांच्यावर जबर संहारक असा लष्करी पराभव लादणे आवश्यक आहे. युक्रेनच्या लष्करी तुकड्या व शस्त्रसामुग्री मोठ्या प्रमाणात नष्ट व्हायला हवी. युक्रेनचे निर्लष्करीकरण करून सध्याची राजवट पूर्णपणे खिळखिळी करायला हवी’, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया नोंदविताना रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी हे उद्गार काढल्याचे सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |