‘अण्वस्त्र करारा’तील अमेरिकेच्या माघारीला रशिया लष्करी प्रत्युत्तर देईल – रशियाचा अमेरिकेला गंभीर इशारा

‘अण्वस्त्र करारा’तील अमेरिकेच्या माघारीला रशिया लष्करी प्रत्युत्तर देईल – रशियाचा अमेरिकेला गंभीर इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाने अमेरिकेबरोबरच्या ऐतिहासिक ‘इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’चे (आयएनएफ) उल्लंघन केल्याचा आरोप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आयएनएफ’मधून माघार घेण्याची घोषणा केली. यावर खवळलेल्या रशियाने हा निर्णय घेऊन अमेरिकेने धोकादायक पाऊल उचलल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर ‘अमेरिकेच्या एकतर्फी निर्णयावर रशियाकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, कदाचित हे प्रत्युत्तर लष्करीही असू शकते’, अशी धमकी रशियाने दिली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशियाच्या दौर्‍यावर असताना या सर्व घडामोडी घडल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर ‘आयएनएफ’मधून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ही घोषणा करीत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही टीका केली. ‘‘रशियाने वारंवार ‘आयएनएफ’चे उल्लंघन सुरू ठेवले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रशियाकडून हे उल्लंघन होत आहे. हे माहित असूनही ओबामा यांनी कारवाई करण्याचे का टाळले, याचे उत्तर सापडत नाही. पण यापुढे असे होऊ देणार नाही. यासाठी अमेरिका या करारातून माघार घेत आहे’’, असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशियाच्या दौर्‍यावर असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली. बोल्टन रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेणार असून यावेळी उत्तर कोरियाबाबतच्या निर्बंधांवर चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर येत्या वर्षअखेरीस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व रशियाकडून माहिती प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ट्रम्प यांनी ‘आयएनएफ’मधून माघार घेण्याचे जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. रशियाने ट्रम्प यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली.

‘हा अतिशय गंभीर मुद्दा असून यावर जाहीरपणे बोलणे योग्य नाही. अमेरिकेने याआधीही इराणबरोबरच्या अणुकरारातून एकतर्फी माघार घेतली होती. तसेच इतर करारांच्या बाबतही अमेरिकेने असेच केले होते. अमेरिकेच्या अशा एकतर्फी निर्णयांना इतर देशांची मान्यता मिळणार नाही व अमेरिकेने याकडे दुर्लक्ष करू नये’, असा इशारा रशियन उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिबकोव्ह यांनी दिला. तसेच ‘अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि स्थैर्याला हादरे बसत आहेत. यापुढे अमेरिका अशाच प्रकारे एकतर्फी निर्णय घेणार असेल तर रशियाला वेगळ्या पर्यायांचा स्वीकार करावा लागेल. यामध्ये लष्करी पर्यायांचाही समावेश असेल’, असे रिबकोव्ह यांनी धमकावले.

१९८७ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात ‘आयएनएफ’ करार झाला होता. या कराराप्रमाणे अमेरिका आणि रशियासाठी अण्वस्त्रांची चाचणी तसेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवरील तैनाती करण्यावर बंदी होती. या करारामुळे युरोप तसेच पूर्व युरोपीय देशांच्या सुरक्षेची हमी मिळाल्याचे बोलले जात होते. पण सदर करार पुढच्या दोन वर्षात संपुष्टात येणार होता.

मात्र या कराराचे नूतनीकरण न करता ट्रम्प यांनी सदर करारातून माघार घेण्याचे जाहीर केले. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने वाढविलेल्या आण्विक हालचाली तसेच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आक्रमक घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयासाठी जबाबदार असल्याचा दावा अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info