Breaking News

हौथी बंडखोरांमुळे येमेनच्याजनतेवर उपासमारीचे संकट संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चा आरोप

वॉशिंग्टन – येमेनमधील हौथी बंडखोर आपल्याच देशातील जनतेला उपाशी मारत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला. संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाठविण्यात येणारे ‘फूड पॅकेट्स’ येमेनच्या ९९ टक्के जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने (डब्ल्यूएफपी) केला. गरजू येमेनी जनतेपर्यंत सदर ‘फूड पॅकेट्स’ पोहोचविण्याऐवजी हौथी बंडखोर या अन्नावर डल्ला मारत असल्याचा ठपका या संघटनेने ठेवला. हौथी बंडखोरांनी येत्या दोन दिवसात आपल्या कारवाया बंद केल्या नाही तर येमेनला पुरविण्यात येणारे अन्नसहाय्य रद्द करण्याचा इशारा ‘डब्ल्यूएफपी’ने दिला.

हौथी बंडखोर, अन्नावर डल्ला, वर्ल्ड फूड प्रोग्राम, उपासमारी, भ्रष्टाचार, वॉशिंग्टन, हौदेदा बंदर

गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या विमानतळांवरील हवाई तसेच ड्रोन हल्ले वाढविले आहेत. त्याचबरोबर सौदीच्या इंधन पाईपलाईनवरील हल्ल्यांची जबाबदारीही हौथी बंडखोरांनी स्वीकारली आहे. हौथी बंडखोरांच्या या हल्ल्यांवर सौदी व अरब मित्रदेशांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळू शकते. ही शक्यता लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘डब्ल्यूएफपी’चे संचालक ‘डेव्हिड बिस्ले’ यांनी राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीसमोर भीषण वास्तव मांडले.

‘डब्ल्यूएफपी’द्वारे येमेनमध्ये उतरविण्यात येणारे ‘फूड पॅकेट्स’ येथील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप डेव्हिड बिस्ले यांनी केला. ‘सादा’ या बंडखोरांचे प्राबल्य असलेल्या भागातील जनतेला एप्रिल महिन्यात ‘फूड पॅकेट्स’ मिळालेच नाही. राजधानी सना येथील सात सेंटर्सवर देखील हीच परिस्थिती असून ६० टक्के नागरिकांनी अशीच प्रतिक्रिया दिल्याचे बिस्ले यांनी सुरक्षा समितीसमोर सांगितले. गेल्या वर्षी ‘फूड पॅकेट्स’च्या गहाळ होण्याचे पुरावेदेखील सापडले होते. या फूड पॅकेट्सच्या वितरणाची जबाबदारी घेणारे हौथी बंडखोरच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप बिस्ले यांनी केला.

‘डब्ल्यूएफपी’कडून फूड पॅकेट्स मिळाल्यानंतर हौथी बंडखोरांना रजिस्ट्रेशन आणि बायोमेट्रिक नोंदणी करणे आवश्यक असते. पण हौथी बंडखोरांनी पद्धतशीरपणे या नियमांना बगल देऊन ‘फूड पॅकेट्स’चा गैरव्यवहार सुरू ठेवला, असा आरोप बिस्ले यांनी केला. पण यापुढे हौथी बंडखोर ‘फूड पॅकेट्स’चा भ्रष्टाचार बंद करणार नसतील आणि राष्ट्रसंघाच्या नियमांचे पालन करणार नसतील तर या आठवड्याच्या अखेरीपासून सदर अन्नसहाय्य रद्द करण्यात येईल, असा इशारा बिस्ले यांनी दिला.

येमेनमधील सौदी नियंत्रित भागात ‘फूड पॅकेट्स’चे व्यवस्थित सहाय्य पुरविले जात असल्याचेही बिस्ले म्हणाले. पण हौथी बंडखोरांचा प्रभाव असलेल्या भागात उपासमारीमुळे भीषण संकट ओढावण्याची चिंता बेस्ले यांनी व्यक्त केली. याआधी २०१७ साली सौदीने हौदेदा बंदरावर ताबा मिळविल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जहाजांना प्रवेश नाकारला होता. हौथी बंडखोरांची कोंडी करण्यासाठी सौदीने ‘फूड पॅकेट्स’चे जहाज रोखले होते. त्यावेळी देखील बेस्ले यांनी सौदीच्या विरोधात भूमिका घेतली होती.

दरम्यान, हौथी बंडखोरांनी ‘फूड पॅकेट्स’चा भ्रष्टाचार रोखला नाही तर येमेनच्या जनतेवर उपासमारीचे संकट ओढवेल, असा इशारा ‘डब्ल्यूएफपी’ने दिला. तर अन्नासाठी नवा संघर्षही भडकेल, अशी शक्यताही या संघटनेने वर्तविली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info