Breaking News

अमेरिकेचे निर्बंध धुडकावून इराण ‘अराक’ अणुप्रकल्प सुरू करणार

तेहरान – इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पाश्‍चिमात्य देशांना दिलेल्या धमक्या प्रत्यक्षात उतरविण्यास सुरुवात केली आहे. याआधी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा निषेध करून इराणने अणुप्रकल्पातील संवर्धित युरेनियमचा साठा नियोजित मर्यादेपेक्षा अधिक करण्याची धमकी इराणने खरी करून दाखविली. तर लवकरच ‘अराक’ येथील अतिशय संवदेनशील अणुप्रकल्प पहिल्याप्रमाणे कार्यान्वित करण्याची घोषणा करून राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पाश्‍चिमात्य देशांना दिलेली दुसरी धमकी प्रत्यक्षात उतरविली आहे. इराणचा अणुप्रकल्प वाचविण्यासाठी युरोपिय देश व्हिएन्ना येथील तातडीच्या बैठकीसाठी जमा होत असताना इराणने ‘अराक’चा निर्णय घेऊन पाश्‍चिमात्य देशांना इशारा दिला आहे.

अणुप्रकल्प, कार्यान्वित करण्याची घोषणा, अराक, हसन रोहानी, न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर, इराण, अमेरिका, इस्रायलइराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख ‘अली अकबर सालेही’ यांनी रविवारी संसदेला दिलेल्या माहितीत, ‘अराक’ प्रकल्प सुरू करण्याचे जाहीर केले. ‘हेवी वॉटर न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेला ‘अराक’ प्रकल्प कार्यान्वित करून इराणने युरोपिय देशांवरील दबाव वाढविला आहे. त्याचबरोबर अमेरिका, इस्रायल यांना देखील धमकावल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. अणुप्रकल्पात वापरल्या जाणार्‍या ‘हेवी वॉटर’मुळे ‘प्लुटोनियम’च्या निर्मितीला वेग मिळतो. या प्लुटोनियमचा इंधन म्हणून वापर अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे अराक प्रकल्पाबाबत इराणचा निर्णय संकेत देणारा असल्याचे बोलले जाते.

इराणचा अराक अणुप्रकल्प नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याच अणुप्रकल्पात इराण अणुबॉम्बनिर्मिती करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. तर इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरीक्षकांना कधीही अराक प्रकल्पाच्या पाहणीला मंजूरी दिली नव्हती. त्यामुळे ‘अराक’बाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते.

२०१५ साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर झालेल्या करारातही अराकमधील संशोधन पूर्णपणे बंद करण्याची अट पाश्‍चिमात्य देशांनी घातली होती. पण पाश्‍चिमात्य देशांची मागणी धुडकावून इराणने अराकमध्ये छुप्यारितीने संशोधन सुरू ठेवल्याचा आरोप इस्रायलने केला होता.

अशा परिस्थितीत, इराणने ‘अराक’ पुन्हा कार्यान्वित करण्याचे जाहीर करून अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने पावले टाकल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्रे करीत आहेत. पण काही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज देश होऊ देणार नसल्याचे अमेरिका, इस्रायलने जाहीर केले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info