युरोप म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडचा आधारस्तंभ – माजी सदस्याची माहिती

युरोप म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडचा आधारस्तंभ – माजी सदस्याची माहिती

कैरो – ‘रशिया, मध्य आशियाई आणि अरब देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहूड’चा कारभार युरोपमधून चालविला जातो. युरोप म्हणजे या संघटनेचा पाठीचा कणा असून युरोपिय देशांमधून ब्रदरहूडच्या कारवायांना आर्थिक सहाय्य मिळते’, अशी धक्कादायक माहिती ब्रदरहूडमधून बाहेर पडलेल्या एकाने उघड केली. तर युरोपमधून येणारा पैसा ‘आयएस’, ‘अल कायदा’ आणि इतर दहशतवादी संघटनांना पुरविला जातो,?असा खळबळजनक दावा एका मानवाधिकार कार्यकर्त्याने केला आहे.

‘संयुक्त अरब अमिराती’चा (युएई) नागरिक ‘अब्दुलरहमान अल-सुवैदी’ याने अरब-आखाती तसेच युरोप, आग्नेय आशियाई देशांमध्ये पसरलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहूड’बाबत हा खुलासा केला. याआधी ३५ वर्षे मुस्लिम ब्रदरहूडचा दहशतवादी असलेल्या ‘सुवैदी’ने २०१५ साली या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रदरहूड’च्या नेत्यांनी ‘युएई’मध्ये हल्ले घडवून अस्थैर्य माजविण्याचा कट आखल्यानंतर सुवैदी’ने या संघटनेच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ओमानमार्गे येमेन, तुर्की, थायलंड, मलेशियानंतर ‘युएई’मध्ये परतलेल्या सुवैदी’ने सुरक्षा यंत्रणांना ‘ब्रदरहूड’च्या दहशतवादी योजनांची माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी फ्रेंच मासिक ‘ली पॉईंट’ला दिलेल्या मुलाखतीत सुवैदीने ‘ब्रदरहूड’च्या आर्थिक स्त्रोतांची माहिती दिली. ‘‘‘मुस्लिम ब्रदरहूड’ अरब-आखाती देशांपुरती मर्यादित नसून या संघटनेची पाळेमुळे युरोपिय देशांमध्येदेखील पसरलेली आहेत. ब्रदरहूडचे नेते तसेच कट्टर समर्थकांनी लंडनसह इतर युरोपिय देशांमध्ये मोठी संपत्ती जमा केली आहे. युरोपमधील ब्रदरहूडचे हे नेते व त्यांचे हस्तक हेच या संघटनेचा कणा ठरतात’, असे सुवैदीने सांगितले. तर अरब देशांपैकी कतारकडून ‘ब्रदरहूड’च्या नेत्यांना पैसा पुरविला जातो, असे सुवैदी म्हणाला. तर कतारप्रमाणे तुर्की आणि इराणकडूनही ब्रदरहूड व इतर दहशतवादी संघटनांना सहाय्य केले जात असल्याची माहिती अन्य एका अधिकार्‍याने दिली आहे.

आखातातील मानवाधिकार अधिकार कार्यकर्ते ‘हयथाम शराबी’ यांनी देखील इजिप्तमील एका वृत्तपत्राशी बोलताना युरोपमधील ब्रदरहूडच्या शाखा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले. युरोपिय देशांमध्ये पर्यटन आणि ट्रॅव्हल ऑफिसेसच्या आडून तसेच सामाजिक कार्य, इस्लामिक सेंटर आणि संघटनांमार्फत ब्रदरहूडचे नेते व समर्थक मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतात. याच नेटवर्कच्या सहाय्याने युरोपमधील कट्टरपंथियांची सिरिया, लिबिया, इराक आणि येमेनमधील ‘आयएस’, ‘अल कायदा’ आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये भरती केली जात असल्याची माहिती शराबी यांनी दिली.

दरम्यान, इजिप्तच्या सिसी सरकारने ‘मुस्लिम ब्रदरहूड’विरोधात मोठी मोहीम छेडली असून अनेक बड्या नेत्यांना कैद केले आहे. या संघटनेपासून आपल्या देशाला धोका असल्याचे जाहीर करून इजिप्तच्या सरकारने ही कारवाई सुरू केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info