काबुलमधील हल्ल्यात ब्लॅकवॉटर्सचा प्रमुख ठार झाल्याने अमेरिकेने तालिबानबरोबरील चर्चा रद्द केली – पाकिस्तानच्या तालिबानसमर्थक विश्‍लेषकाचा दावा

काबुलमधील हल्ल्यात ब्लॅकवॉटर्सचा प्रमुख ठार झाल्याने अमेरिकेने तालिबानबरोबरील चर्चा रद्द केली – पाकिस्तानच्या तालिबानसमर्थक विश्‍लेषकाचा दावा

काबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे तालिबानने २ सप्टेंबर रोजी हल्ला चढविला होता. यात अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यासह ३० जण ठार झाले होते. यानंतर अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानबरोबरील चर्चा रद्द करून टाकली होती. त्यांच्या या निर्णयामागची पार्श्‍वभूमी आता समोर येऊ लागली आहे. काबुलमधील ‘ग्रीन व्हिलेज’ या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी घणाघाती हल्ला चढवून तालिबानने ‘ब्लॅकवॉटर्स’च्या जवानांसह त्यांच्या अफगाणिस्तानातील प्रमुखाचाही बळी घेतला. यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानबरोबरील चर्चा रद्द करून टाकली, असे पाकिस्तानातील एका विश्‍लेषकाने म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आणि विश्‍लेषक तसेच तालिबानचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले ओरिया मकबूल जान यांनी ही माहिती उघड केली. ग्रीन व्हिलेजवर तालिबानने चढविलेला हल्ला इतका भीषण होता की त्यांनी जागीच ब्लॅकवॉटर्सच्या ३० जणांना ठार केले. ब्लॅकवॉटर्स ही खाजगी सैनिक पुरविणारी  कंत्राटी कंपनी असून ब्लॅकवॉटर्सचे जवान अफगाणिस्तानात तैनात आहेत, ही बाब  अमेरिकेने उघडपणे मान्य केली नव्हती. मात्र अफगाणिस्तानातील युद्धात आपले सैनिक गमावण्यापेक्षा अमेरिकेने आपल्या कंपनीला याचे कंत्राट द्यावे, असा प्रस्ताव ब्लॅकवॉटर्सचे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी काही काळापूर्वी दिला होता. असे असले तरी ब्लॅकवॉटर्स अफगाणिस्तानात कार्यरत आहे, असे दावे याआधी झाले होते. यासंदर्भात नवी माहिती उघड करून ओरिया मकबूल जान यांनी तालिबानच्या हल्ल्यात ठार झालेल्या ३० जणांमध्ये ब्लॅकवॉटर्सचा अफगाणिस्तानातील प्रमुख शफिकुल्लाह देखील होता, असे म्हटले आहे.

तालिबानच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर शफिकुल्लाहला ठार करण्यात आल्याची माहिती दिली होती.  शफिकुल्लाह याने आत्तापर्यंत कित्येक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले होते. त्याला संपवून तालिबानने आपला सूड घेतल्याचा दावा ओरिया मकबूल जान यांनी केला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानातील युद्धात तालिबान जिंकत असून अमेरिकेला आज नाहीतर उद्या, इथून पराभूत होऊन माघारी फिरावेच लागेल, असा दावा ओरिया मकबूल जान यांनी केला. त्याचवेळी अमेरिका आणि तालिबानमधील चर्चा फिस्कटल्याने अफगाणिस्तानचे सरकार आणि भारत अतिशय खूश झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानातील अमेरिकाधार्जिणे देखील यामुळे आनंदित झाल्याचे ओरिया मकबूल जान यांचे म्हणणे आहे.

पण काहीही झाले तरी अफगाणिस्तानातील युद्धात अखेरीस तालिबानचाच विजय होईल. हे लक्षात घेऊन पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारने व पाकिस्तानी लष्कराने अमेरिकेची बाजू घेऊन तालिबानशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करू नये. तसे झाले तर त्यामुळे पाकिस्तानची अतोनात हानी होईल, असा इशारा ओरिया मकबूल जान यांनी दिला आहे.

दरम्यान, सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले व या युद्धात पराभव झाल्यानंतर सोव्हिएत संघराज्याचे विघटन झाले. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात आक्रमण करून आपले महासत्तापद गमावण्याची तयारी केल्याचे दावे करणारा कट्टरपंथीयांचा गट पाकिस्तानात आहे. ओरिया मकबूल जान या गटाच्या बाजूने उभे राहिले असून तालिबानी उघडपणे बाजू घेणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. त्यांनी तालिबान आपल्या कट्टर भूमिकेवर ठाम राहिल्याचे सांगून यासाठी तालिबानचे कौतुक केले आहे. पाकिस्ताननेही अशीच भूमिका स्वीकारावी, अशी ओरिया मकबूल जान यांची मागणी आहे.

अमेरिकेची अफगाणिस्तानातील तैनाती आवश्यकच – माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस

वॉशिंग्टन, दि. ११ (वृत्तसंस्था) –  ‘आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अमेरिकेला चर्चेची गरज वाटत आहे, याची खात्री तालिबानला पटली होती. म्हणूनच अमेरिकेबरोबरील चर्चेत तालिबानने ताठर भूमिका घेतली. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानबरोबरील ही चर्चा निकालात काढली. त्यानंतर मी सुटकेचा निःश्‍वास टाकला’, असे  अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी म्हटले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात अमेरिकेने यापुढेही सैनिक तैनात ठेवावे, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे राईस म्हणाल्या.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकाच्या निमित्ताने अमेरिकन वृत्तवाहिन्याशी चर्चा करणार्‍या राईस यांनी तालिबानबरोबरील अमेरिकेच्या चर्चेबाबतचे परखड मत मांडले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही चर्चा रद्द करून योग्यच निर्णय घेतल्याचे राईस म्हणाल्या. त्याचवेळी गेल्या १८ वर्षांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धाने अमेरिकन जनता वैतागली आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यावश्यकच असल्याचे राईस यांनी ठासून सांगितले. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याचा कट अफगाणिस्तानातच शिजला होता, याची आठवण राईस यांनी करून दिली.

अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्तानात यापुढेही सैनिक तैनात ठेवणे भाग आहे. दक्षिण कोरियात गेल्या पन्नास वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य तैनात आहे व ते सुरक्षेसाठी आवश्यकच होते. या दृष्टीकोनातून आपण अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तैनातीकडे पहायला हवे, असे कॉन्डोलिझा राईस यांनी लक्षात आणून दिले. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिलेल्या राजीनाम्याचेही राईस यांनी समर्थन केले.

 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info