चीनधर्जिण्या प्रशासनाच्या ‘इमर्जन्सी पॉवर्स’ हाँगकाँगच्या आंदोलकांनी धुडकावल्या – चिनी बँका व मेट्रो यंत्रणा लक्ष्य

चीनधर्जिण्या प्रशासनाच्या ‘इमर्जन्सी पॉवर्स’ हाँगकाँगच्या आंदोलकांनी धुडकावल्या – चिनी बँका व मेट्रो यंत्रणा लक्ष्य

हाँगकाँग – हाँगकाँगचे आंदोलन चिरडण्यासाठी चीनधर्जिण्या प्रशासनाने लागू केलेल्या ‘इमर्जन्सी पॉवर्स’ आंदोलकांनी धुडकावून लावल्या आहेत. याअंतर्गत हाँगकाँगमधील सुरक्षायंत्रणांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून निदर्शकांकडून वापरण्यात येणार्‍या ‘मास्क’वरही बंदी घालण्यात आली. मात्र ही बंदी नाकारून हाँगकाँगमध्ये पुन्हा तीव्र निदर्शने सुरू झाली असून मेट्रो यंत्रणा व चिनी बँकांना लक्ष्य करण्यात येत आहे. याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा तरुण निदर्शकावर गोळी झाडण्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हाँगकाँगमध्ये तब्बल पाच महिने चीनधर्जिण्या प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक यंत्रणांना अपयश आले आहे. निदर्शकांच्या मागण्या स्थानिक प्रशासनाने नाकारल्याने आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. ही तीव्रता कमी करण्यासाठी हाँगकाँगमधील चीनधर्जिण्या प्रशासनाने आंदोलकांविरोधात अमानुष पोलिसी बळाचा वापर चालविला आहे.

मात्र आक्रमक पोलिसी कारवाईनंतरही हाँगकाँगचे आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे हाँगकाँग प्रशासनाने ‘इमर्जन्सी पॉवर्स’चा आधार घेतला आहे. या अधिकारांनुसार सार्वजनिक हितसंबंधांचे कारण पुढे करून स्थानिक प्रशासन जनतेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करु शकते. हे अधिकार ब्रिटीशकालिन असून ब्रिटनने हाँगकाँग चीनच्या ताब्यात दिल्यानंतरही कायम ठेवण्यात आले आहेत.

शनिवारपासून ‘इमर्जन्सी पॉवर्स’ लागू झाल्या असल्या तरी त्याविरोधातील असंतोष शुक्रवारीच उफाळून आल्याचे दिसून आले. संतप्त निदर्शकांनी ‘मास्क’चा वापर करीत हाँगकाँगमधील मेट्रो रेल्वे स्थानकांना लक्ष्य केले. त्याचवेळी शहरातील चिनी बँका व चीनशी निगडित इतर उपक्रमांचीही तोडफोड करण्यात आली. या आक्रमक निदर्शकांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करण्यात आला.

अशाच एका घटनेत पोलिसांनी १४ वर्षाच्या तरुणावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. निदर्शकांवर थेट गोळी झाडली जाण्याची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मंगळवारी झालेल्या निदर्शनांमध्ये आंदोलनकर्त्याच्या छातीत गोळी घालण्यात आली होती. शुक्रवारी १४ वर्षीय तरुणाच्या मांडीवर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info