अमेरिकेच्या धमक्यांना अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्याचा उत्तर कोरियाचा इशारा

अमेरिकेच्या धमक्यांना अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्याचा उत्तर कोरियाचा इशारा

प्योनग्यांग/वॉशिंग्टन – अमेरिकेकडून देण्यात येणार्‍या आण्विक व चिथावणीखोर धमक्यांना अण्वस्त्रांनीच प्रत्युत्तर मिळेल अशी धमकी उत्तर कोरियाने दिली आहे. उत्तर कोरियाने चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे खूप प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले आहेत, असा दावा करून उत्तर कोरियाने अणुहल्ल्याबाबत धमकावले. कोरियन युद्धाला ७० वर्ष पूर्ण होत असतानाच उत्तर कोरियाचा नेतृत्वाने नवा इशारा देऊन या क्षेत्रात पुन्हा संघर्ष भडकण्याचे संकेत दिले आहेत.

‘अमेरिकेकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या आण्विक धमक्यांची अखेर व्हावी यासाठी उत्तर कोरियाच्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले. यावेळी उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचीही मदत घेतली. मात्र हे सर्व प्रयत्न फुकट गेले आहेत. अमेरिकेकडून उत्तर कोरियाविरोधात शत्रुत्वाचे धोरण कायम राहिले. त्यामुळे आता उत्तर कोरिया समोर दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसून अमेरिकेच्या धमक्यांना आता अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर मिळेल’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली.

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या निवेदनात ही धमकी देण्यात आल्याची माहिती कोरियन प्रसारमाध्यमांनी दिली. या निवेदनात, अमेरिकेला रोखण्यासाठी उत्तर कोरिया आपल्याकडील अण्वस्त्रांचा साठा अधिक वाढविणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर कोरियाची धमकी व अण्वस्त्रांच्या साठ्यात वाढ करण्याबाबत दिलेला इशाऱ्यामुळे कोरियन क्षेत्रात पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.

गेल्याच आठवड्यात उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात नवी भर टाकत असल्याचा अहवाल समोर आला होता. युरोपातील ‘सिप्री’ या अभ्यासगटाने ही माहिती देताना उत्तर कोरियाने १० नवी अण्वस्त्रे तयार केल्याचे म्हटले होते. कांगसोनमधील युरेनियमचे संवर्धन करणाऱ्या प्रकल्पावर ही अण्वस्त्रे दडवून ठेवल्याचा दावा ‘सिप्री’ने केला. उत्तर कोरियाकडे सध्या ३० हून अधिक अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते.

नव्या अण्वस्त्रनिर्मितीबरोबरच उत्तर कोरियाने काही गुप्त नौदल तळ उभारले असल्याचा दावा संशोधकांनी केला होता. जेकब बॉगल यांनी उपग्रहांद्वारे मिळालेल्या फोटोग्राफ्सच्या आधारे माहिती दिली होती. उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टी भागात असणाऱ्या ‘सिंपो’मध्ये हे तळ उभारण्यात आले आहेत. या तळांवर युद्धनौका तसेच पाणबुड्यांच्या तैनातीची व्यवस्था करण्यात आल्याचे बॉगल यांनी आपल्या दाव्यात म्हटले होते. ‘सिप्री’चा अहवाल व नव्या तळांबाबत समोर आलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने दिलेली अण्वस्त्रांची धमकी लक्ष वेधून घेणारी ठरते.

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगने दक्षिण कोरियाला लष्करी कारवाईची धमकी दिली होती. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरील सर्वच पातळ्यांवरील संपर्कही तोडून टाकला होता. दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची हेटाळणी करणारे बलून्स सोडले जात आहेत व दक्षिण कोरियन सरकार या कारवाया थांबविण्यास अपयशी ठरले आहे, असा ठपका ठेऊन उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला होता.

त्यानंतर अधिक आक्रमक झालेल्या उत्तर कोरियाने दोन देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी उभारण्यात आलेले कार्यालयही बॉम्बस्फोटात उडवून दिले. उत्तर कोरियाने आपले जवान दक्षिण कोरियाच्या सीमेला जोडून असलेल्या ‘डिमिलिटराईझ्ड झोन’मध्ये तैनात केल्याचेही सांगण्यात येते.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info