चीनकडून उघुरवंशियावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अमेरिका व ब्रिटन आक्रमक

चीनकडून उघुरवंशियावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अमेरिका व ब्रिटन आक्रमक

वॉशिंग्टन/लंडन – चीनकडून उघुरवंशिय इस्लामधर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अमेरिका व ब्रिटन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाने उघुरवंशियांचा गुलाम कामगार म्हणून वापर करून घेण्यात येणाऱ्या चिनी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. तर ब्रिटनच्या १३० हून अधिक संसद सदस्यांनी चिनी राजदूतांना पत्र लिहून, चीनची सत्ताधारी राजवट उघुरवंशियांचा वंशसंहार करीत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. अमेरिका व ब्रिटनने उचललेली ही पावले चीन विरोधातील राजनैतिक संघर्षाची धार अधिकच तीव्र होत असल्याचे संकेत देत आहेत.

अमेरिकेच्या ‘कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ विभागाने चीनच्या झिंजीआंग प्रांतातून आयात होणाऱ्या कापूस व टोमॅटो यासह अनेक उत्पादनांच्या आयातीवर बंदी टाकण्याचे संकेत दिले आहेत. आयातीवरील बंदीच्या आदेशाचा मसुदा तयार असून येत्या काही दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. झिंजीआंग प्रांतात घेण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट उघुरवंशीयांचा गुलाम कामगार म्हणून वापर करीत असल्याचे समोर आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून कापूस व टोमॅटोसह सात मुख्य उत्पादनांच्या आयातीवर बंदी जाहीर होऊ शकते.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनाने व्यापार, मानवाधिकार यासह अनेक मुद्द्यांवरून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उघुरवंशीयांवरील अत्याचारांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘उघुर ह्युमन राईट्स ॲक्ट’वर स्वाक्षरी केली होती. उघुरवंशियांशी निगडित या कायद्यात चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद आहे. त्यानंतर जुलै महिन्यात उघुरवंशीयांचा गुलाम कामगारांप्रमाणे वापर करणाऱ्या ११ चिनी कंपन्यांना अमेरिकेने ‘ब्लॅकलिस्ट’ केले. या कंपन्यांमध्ये अमेरिकेतील ‘ॲपल’, ‘ॲमेझॉन’, ‘मायक्रोसॉफ्ट’ यासारख्या मोठ्या कंपन्यांना कच्चा माल व उत्पादने पुरविणाऱ्या चिनी कंपन्यांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेने झिंजिआंग प्रॉडक्शन अँड कन्स्ट्रक्शन कॉर्प्स'(एक्सपीसीसी) या चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित निमलष्करी संघटनेवर निर्बंध लादल्याची घोषणा केली होती. आता उत्पादनांची आयात रोखण्याचे संकेत देऊन अमेरिकेने चीनला नवा धक्का देण्याची तयारी केल्याचे दिसते.

अमेरिकेबरोबरच्या ब्रिटनमध्येही उघुरवंशियांच्या मुद्द्यावर चीन विरोधातील असंतोष वाढतो आहे. ब्रिटनच्या संसदेतील तब्बल १३० हून अधिक संसद सदस्यांनी ब्रिटनमधील चिनी राजदूत लिऊ शाओमिंग यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरवंशिय इस्लामधर्मियांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या राजवटीकडून उघुरवंशियांचा वंशसंहार सुरू असल्याचा आरोपही ब्रिटिश संसद सदस्यांनी केला आहे. चीनकडून सुरू असलेल्या अत्याचारांवर कोणीही डोळेझाक करू शकत नाही आणि ब्रिटनमधील चिनी राजदूतांनीही या कारवायांचा स्पष्ट शब्दात निषेध करावा अशी आग्रही मागणीही संसद सदस्यांनी केली आहे.

चीनकडून गेली काही वर्षे झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा सातत्याने छळ सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली आहे. २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून अमेरिका व ब्रिटनची कारवाई त्याचाच भाग दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info