इराणच्या हल्ल्याला अमेरिका हजार पट तीव्र प्रत्युत्तर देईल – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

इराणच्या हल्ल्याला अमेरिका हजार पट तीव्र प्रत्युत्तर देईल – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

कॅलिफोर्निया – ‘अमेरिकी सैनिकांच्या हत्येचा कट रचणारा दहशतवादी नेता कासेम सुलेमानी याच्यावर केलेल्या कारवाईचा सूड घेण्यासाठी इराण घातपात किंवा हल्ला चढविण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या आहेत. पण असे झाले तर, अमेरिकेवरील इराणच्या कुठल्याही स्वरुपाच्या हल्ल्याला हजार पट तीव्रतेने प्रत्युत्तर मिळेल’, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. इराणने दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकेच्या राजदूत लाना मार्क्स् यांच्या हत्येचा कट रचल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला बजावले आहे.

अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने गुप्तचर यंत्रणेच्या काही अधिकार्‍यांच्या हवाल्याने बातमी प्रसिद्ध केली होती. गेल्या काही महिन्यांपासून सूडाच्या प्रतिक्षेत असलेला इराण अमेरिकेला मोठा हादरा देण्याची तयारी करीत असल्याचे यामध्ये म्हटले होते. यासाठी इराण दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकेच्या राजदूत लाना यांची हत्या घडविण्याची योजना इराणने आखली होती. राजदूत लाना ह्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटतम सहकारी तसेच ज्यूधर्मिय आहेत. त्यामुळे त्यांची हत्या घडवून इराण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना मोठा हादारा देण्याची तयारी करीत असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेतील इराणचे दूतावास या कटात सहभागी असल्याचा दावाही सदर वर्तमानपत्राने केला होता. तर इराणने सदर वृत्त फेटाळले होते.

पण, या बातमीची दखल घेऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला इशारा दिला आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेने इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या ड्रोन कारवाईत इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी आणि त्यांच्या सहकार्‍यांना संपविले होते. इराक, सिरियातील इराणच्या लष्करी कारवाईचे नेतृत्त्व करणार्‍या सुलेमानी यांच्यावरील या कारवाईने इराणला जबद हादरा बसला होता. इराणने सुलेमानी यांच्यावरील कारवाईचा सूड घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुढील काही आठवडे इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार रॉकेट हल्ले चढविले होते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा इशारा येण्याच्या काही तास आधी देखील इराकमधील इराणसंलग्न ‘कतैब हिजबुल्लाह’च्या दहशतवाद्यांनी बगदादमधील अमेरिकेचे दूतावास आणि लष्करी तळावर कत्युशा रॉकेट्सचे हल्ले चढविले. अमेरिकेच्या ‘सी-रॅम’ या हवाई यंत्रणेने इराणी बनावटीच्या या कत्युशा रॉकेट्सचे हल्ले हाणून पाडले. असे असले तरी दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकी राजदूत लाना किंवा अमेरिकी दूतावासावरील हल्ले यशस्वी ठरले तर या क्षेत्रातील तणाव वाढून संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशारा आखातातील माध्यमे देत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info