अमेरिकेबरोबर नव्या शीतयुद्धाची वेळ ओढावल्यास रशिया तयार आहे – रशियन प्रवक्त्यांचा दावा

अमेरिकेबरोबर नव्या शीतयुद्धाची वेळ ओढावल्यास रशिया तयार आहे – रशियन प्रवक्त्यांचा दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी रशियाने नेहमीच प्रयत्न केले आहेत, पण पुन्हा एकदा शीतयुद्धाची वेळ ओढवली तर रशिया त्यासाठी तयार असल्याचा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा उल्लेख मारेकरी असा करून कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर पुतिन यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना प्रत्युत्तर देतानाच आपण त्यांच्याशी थेट ऑनलाईन चर्चेकरीता तयार असल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी शीतयुद्धाबाबत केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेवर आल्यापासून रशियाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका करून बायडेन यांनी आपण रशियासमोर लोळण घेणार नाही, असे बजावले होते. गेल्या दोन महिन्यात बायडेन यांनी रशियाविरोधात निर्णय घेण्याचा धडाका लावला असून नॅव्हॅल्नी प्रकरणावरून लादलेले निर्बंध, युक्रेनला जाहीर केलेले नवे संरक्षणसहाय्य, सायबरहल्ल्यांवरून दिलेला इशारा यांचा त्यात समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात २०२० साली झालेल्या निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. बायडेन यांच्या भूमिकेवर रशियाने सातत्याने नाराजी व्यक्त केली असून ‘जशास तसे’ उत्तर देण्यात येईल, असेही वारंवार बजावले आहे. मात्र असे असले तरी रशियाने अद्याप अमेरिकेविरोधात मोठा निर्णय घेतला नव्हता. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांविषयी केलेल्या उल्लेखानंतर परिस्थिती बदलली असून रशियानेही अमेरिकेविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अमेरिकेतील राजदूत मागे बोलाविण्याचा निर्णय व पुतिन यांनी बायडेन यांना लगावलेला टोला त्याचाच भाग मानला जातो. आता रशियन राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी थेट शीतयुद्धाबाबत वक्तव्य करून दोन देशांमधील तणाव टोकाला पोहोचल्याचे संकेत दिले आहेत. ‘बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविषयी केलेले वक्तव्य दुर्लक्षित करणे शक्य नाही. रशियाने अमेरिकेबरोबर चांगले संबंध राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र त्याचवेळी या संबंधांमध्ये अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली, तर त्यालाही तोंड देण्यासाठी रशिया नेहमीच तयार आहे’, अशा शब्दात पेस्कोव्ह यांनी नव्या शीतयुद्धाच्या शक्यतेची जाणीव करून दिली.

मात्र नव्या शीतयुद्धच्या शक्यतेकडे लक्ष वेधतानाच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नेहमीच अमेरिकेबरोबरील सहकार्य कायम ठेवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे, असेही राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. ‘काहीही झाले तरी अमेरिकेविरोधात मोठ्याने आरडाओरड करण्यात तसेच परस्परांना टोमणे मारण्यात अर्थ नाही. संबंध कायम ठेवणे महत्त्वाचे आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितल्याचे पेस्कोव्ह म्हणाले.

English  हिंदी 

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info