सिरियाच्या किनारपट्टीजवळ इराणच्या ऑईल टँकरवर हल्ला – इराणच्या लष्करप्रमुखांकडून इस्रायलला धमकी

सिरियाच्या किनारपट्टीजवळ इराणच्या ऑईल टँकरवर हल्ला – इराणच्या लष्करप्रमुखांकडून इस्रायलला धमकी

बैरूत/सना/तेहरान – सिरियामध्ये दाखल होणार्‍या इराणच्या ऑईल टँकरवर हल्ला झाला असून यात तिघांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. इस्रायलने ड्रोन हल्ल्याद्वारे इराणच्या टँकरला लक्ष्य केल्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र इस्रायली माध्यमांनी या हल्ल्यात इस्रायली लष्कर सहभागी नसल्याचे ठासून सांगितले आहे. पण सिरियातील इराणच्या हितसंबंधाना लक्ष्य करणार्‍या इस्रायलला इराण चांगलाच धडा शिकविल, अशी धमकी इराणच्या लष्करप्रमुखांनी दिली. इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ही घटना घडल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

शनिवारी रात्री सिरियाच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर मोठा स्फोट झाला. सिरियाच्या तार्तूस प्रांतातील ‘बानियास’ प्रकल्पाच्या दिशेने येणार्‍या इराणच्या इंधनवाहू टँकरवर हा स्फोट झाला होता. सुरुवातीला सिरियन टँकरवर हल्ला झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण रविवार सकाळपर्यंत सदर स्फोट इराणी टँकरला लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले.

सिरियन वृत्तसंस्थेने सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर टँकरवरील आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तसेच लेबेनॉनच्या सागरी क्षेत्रातून सिरियाच्या हद्दीत घुसखोरी करणार्‍या ड्रोनने हा हल्ला चढविल्याचे सिरियन सरकारने म्हटले आहे. पण सिरियन सरकार तसेच वृत्तसंस्थेने पहिल्यांदाच या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरण्याचे टाळले.

या स्फोटात इराणी टँकरवरील तिघांचा बळी गेला असून यापैकी दोघे सिरियन कर्मचारी असल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला. तसेच इस्रायलने ड्रोन हल्ल्याद्वारे सदर टँकरला लक्ष्य केल्याची शक्यता या संघटनेने वर्तविली. पण इस्रायली माध्यमांनी सिरियन मानवाधिकार संघटनेने हे आरोप खोडून काढले. सिरियाच्या किनारपट्टीजवळ इराणी टँकरला लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नाही. तसेच यामध्ये विशेष वित्तहानीही झाली नसल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. याशिवाय या दुर्घटनेशी इस्रायली लष्कराचा कुठलाही संबंध नसल्याचे इस्रायली माध्यमांनी ठासून सांगितले आहे.

इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी रविवारी एका सभेमध्ये बोलताना इस्रायलला धमकावले. बाघेरी यांनी देखील शनिवारच्या रात्री घडलेल्या घटनेसाठी इस्रायलला जबाबदार धरण्याचे टाळले. ‘नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. पण सिरियातील इराणच्या हितसंबंधाना वारंवार लक्ष्य केल्यानंतर आपल्याला त्यावर प्रत्युत्तर मिळणार नाही, असे इस्रायलला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने चढविलेले हल्ले आणि भविष्यातील त्यांच्या योजनांसाठी, इराणचे लष्कर इस्रायलला चांगलाच धडा शिकविल. इस्रायल शांतीने जगू शकणार नाही’, अशी धमकी मेजर जनरल बाघेरी यांनी दिली.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info