रशियाने युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांविरोधात सूड उगविण्यास सुरुवात केली आहे

- राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा दावा

किव्ह/मॉस्को – रशियाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी युक्रेनने प्रतिहल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. या प्रतिहल्ल्यांविरोधात रशियाने सूड उगविण्यास सुरुवात केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. नव्या वर्षात रशियन फौजांनी पूर्व युक्रेनमधील हल्ले अधिक प्रखर केले असून सोलेदार हे शहर ताब्यात घेण्यातही रशियाला यश आले आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसात रशियन फौजांनी बाखमत शहरानजिकचे दोन भाग ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. या भागात रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचा उल्लेख करताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशिया सूड उगवित आहे, असा दावा केला आहे.

प्रतिहल्ल्यांविरोधात

गेल्याच आठवड्यात, रशियाने नाटो व पाश्चिमात्य देशांविरोधात युद्धाला सुरुवात केली असून युक्रेनमधील संघर्ष आता वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो, असा इशारा युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी स्टेफानो सॅनिनो यांनी दिला होता. पाश्चिमात्य देश युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करीत असून त्यात क्षेपणास्त्रे व रणगाड्यांचा समावेश आहे. याविरोधात रशियाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली असून नवा शस्त्रपुरवठा म्हणजे नाटो उघडपणे युद्धात उतरल्याचे संकेत असल्याचे रशियन नेते व अधिकारी बजावत आहेत. या शस्त्रपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवरच रशियाने आपल्या युक्रेन मोहिमेची फेररचना केली असून नवी तैनाती व नव्या शस्त्रांसह तीव्र हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

प्रतिहल्ल्यांविरोधात

नव्या वर्षात रशियाने पुन्हा एकदा युक्रेनमधील मोठ्या शहरांवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचे हल्ले केले आहेत. त्याचवेळी दक्षिण युक्रेनमधील खेर्सन तसेच झॅपोरिझआमधील युक्रेनी लष्कराची आगेकूच रोखण्यातही रशियाला यश मिळाले आहे. रशियन फौजांच्या वाढत्या आक्रमकतेपुढे युक्रेनी फौजा अपयशी ठरल्या असून गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनला कोणतेही मोठे शहर अथवा भाग पुन्हा ताब्यात घेता आलेला नाही. त्याचवेळी रशियन फौजा डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहराच्या सीमेवर येऊन ठेपल्या असून गेल्या सात दिवसात दोन छोटी शहरे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिहल्ल्यांविरोधात

रशियाचे हे हल्ले नव्या मोठ्या आक्रमणाची तयारी असल्याचे दावे युक्रेनकडून करण्यात येत आहेत. रशियन आक्रमण रोखण्यासाठी युक्रेनने आता लढाऊ विमानांची मागणी पुढ रेटण्यास सुरुवात केली आहे. पाश्चिमात्य देशांनी ‘एफ-16’ ही लढाऊ विमाने द्यावी म्हणून युक्रेनकडून दबाव टाकण्यात येत आहे. पोलंड व फ्रान्स या देशांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र अमेरिका, ब्रिटन व जर्मनी या देशांनी त्याला विरोध केला असून हा मुद्दा पाश्चिमात्य आघाडीतील मतभेद अधिक तीव्र करणारा ठरला आहे.

प्रतिहल्ल्यांविरोधात

नाटोचा सदस्य देश असणाऱ्या क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविक यांनी युक्रेनला देण्यात येणाऱ्या रणगाड्यांच्या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रणगाड्यांच्या पुरवठ्यामुळे युद्धाचा भडका अधिकच तीव्र होईल, असा इशारा क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. त्याचवेळी क्रिमिआ हा प्रांत पुन्हा कधीच युक्रेनचा भाग होणार नाही, असे वक्तव्यही क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केले. मिलानोविक यांच्या वक्तव्यावर युक्रेनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.

दरम्यान, रशियाने युक्रेनवरील ड्रोनहल्ल्यांची व्याप्ती अधिक वाढविण्याचे संकेत दिले आहेत. इराणपाठोपाठ चीनकडूनही मोठ्या प्रमाणात ड्रोन्स खरेदी करण्यात आली असून यात ‘स्वार्म ड्रोन्स’चा समावेश आहे. चीनच्या ‘मॅव्हिक 2’ या ड्रोन्सचा वापर टेहळणीबरोबरच हल्ल्यांसाठीही करण्याची योजना रशियाने आखल्याचा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info