Breaking News

ट्रम्प यांच्या विरोधकांची सोशल मीडिया नियंत्रित करण्याची तयारी – गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांच्या स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन माध्यमांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या धोरणाविरोधात एकाच दिवशी ३०० हून अधिक वर्तमानपत्रांनी संपादकीय लेख छापून आपली एकजूट दाखवून दिली होती. तर ही वर्तमानपत्रे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या विरोधकांचे हे युद्ध आता सोशल मीडियापर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे. ट्रम्प तसेच उजव्या गटाचा प्रचार रोखण्यासाठी विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांच्याकडून निधी पुरविल्या जाणार्‍या स्वयंसेवी संघटनांनी ‘सोशल मीडिया’वर सेन्सॉरशिप लादल्याचे उघड झाले आहे.

सोशल मीडिया, नियंत्रण, George Soros, डोनाल्ड ट्रम्प, समर्थन, अमेरिका, CREW

‘मीडिया मॅटर्स’ या माध्यमांशी निगडीत असलेल्या संस्थेचे संस्थापक ‘डेव्हिड ब्रोक’ यांनी उजव्या गटाचा प्रचार व तथाकथित ‘फेक न्यूज’वर नियंत्रण मिळविण्यासाठी एक योजना तयार केली होती. २०१७ सालच्या जानेवारी महिन्यात याबाबतचा विस्तृत अहवाल ब्रोक यांनी मांडला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावरील उजव्या गटाचा प्रचार रोखण्यासाठी सोशल मीडिया नियंत्रित करण्याच्या प्रस्तावाचा यात समावेश आहे. उजव्या गटाचा प्रचार आणि तथाकथित फेक न्यूज सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांपर्यंत सहजासहजी पोहोचू नये, यासाठी सोशल नेटवर्किंग साईटस्चे अल्गोरिदम बदलणे आवश्यक असल्याचे या अहवालात सुचविण्यात आले होते.

या कामी डेव्हिड ब्रोस यांच्या ‘मीडिया मॅटर्स’सोबत ‘अमेरिकन ब्रिज’, सिटिझन्स फॉर रिस्पॉन्सिबिलीटी अँड एथिक्स इन वॉशिंग्टन’ (सीआरईडब्ल्यू) या स्वयंसेवी संघटनांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. यावर्षी अमेरिकेत होणारी सिनेटची निवडणूक तसेच पुढच्या काळात होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उजव्या गटाचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना आक्रमक प्रचारमोहीम राबविता येणार नाही, अशारितीने सोशल मीडियामध्ये येणारा मजकूर नियंत्रित करण्याची आवश्यकता व त्याची योजनाच या ४९ पानी अहवालात मांडण्यात आली आहे.

युरोपिय देशांबरोबर अमेरिकेत शिरणार्‍या निर्वासितांचे उघडपणे समर्थन करणारे विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस हे या स्वयंसेवी संस्थांना सढळ हस्ते निधी पुरवित असल्याचेही उघड झाले आहे. ‘द वॉशिंग्टन फ्री बिकन’ नावाच्या संघटनेने हा ४९ पानांचा अहवाल प्रसिद्ध करून खळबळ माजविली आहे. सर्वाधिक लोकशाहीवादी माध्यम अशी इंटरनेटची ओळख धोक्यात आल्याचे या वृत्तामुळे स्पष्ट झाले असून सोशल मीडियावरील अग्रगण्य कंपन्यांच्या विश्‍वासार्हतेवर यामुळे शंका घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणार्‍या कंपनीने केलेल्या फेरबदलांवरही यामुळे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेची जबाबदारी स्वीकारणारे ब्राड पास्र्केल यांनी सोशल मीडियावर अग्रेसर असलेल्या कंपन्यांना यासाठी धारेवर धरले आहे.

पुढच्या काळात याबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करणारे त्यांना रोखण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करीत असल्याच्या आरोपांना यामुळे अधिकच बळ मिळेल. त्याचवेळी जॉर्ज सोरस हे धनाढ्य गुंतवणूकदार आपल्याला धोरणांना विरोध करणार्‍यांचा सोशल मीडियावरील प्रचार स्वयंसेवी संस्थांचा वापर करून रोखत असल्याची उघड झाल्यानंतर उजव्या गटाकडून केला जाणारा प्रचार अधिकच तीव्र होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info