संपूर्ण जगासाठी धोकादायक असलेल्या चीनचे दहा किंवा त्याहून अधिक तुकडे व्हावे – बंडखोर लेखक लिओ यिवु

संपूर्ण जगासाठी धोकादायक असलेल्या चीनचे दहा किंवा त्याहून अधिक तुकडे व्हावे – बंडखोर लेखक लिओ यिवु

बर्लिन/बीजिंग – ‘सध्या चीन जसा आहे त्या स्थितीत तो जगासाठी अत्यंत धोकादायक असून, अशा या चीनचे दहा किंवा त्याहून अधिक तुकडे व्हावेत, असे माझे स्वप्न आहे’, असे खळबळजनक वक्तव्य चीनचे बंडखोर लेखक लिओ यिवु यांनी केले आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे कठोर टीकाकार म्हणून ओळखण्यात येणारे लिओ सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. त्यांनी चीनमधील तिआनमेन हत्याकांडाचे वास्तव सांगणारे नवे पुस्तक लिहिले असून त्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत हे सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारे वक्तव्य केले.

एकेकाळी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीसाठी प्रचार लेखक म्हणून लिओ यिवु यांनी काम केले होेते. पण त्यानंतरच्या काळात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या १० पेक्षा अधिक पुस्तके व कवितांवर चीनमध्ये बंदी घालणत आली. तरीही सोशल मीडियावर त्याचे काही अंश प्रसिद्ध होत असल्याचे सांगण्यात येते. तिआनमेन हत्याकांडावर लिहिलेल्या ‘मॅसाकर’ या कवितेमुळे लिओ यांना पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर चीनमधील सामान्य जनतेचे दुःख मांडणारी त्यांची पुस्तके चर्चेचा विषय ठरली होती. २००८ साली चीनच्या सत्ताधारी राजवटीचा निषेध करणार्‍या ‘चार्टर ०८’ या जाहीरनाम्यातही लिओंचा सहभाग होता.

युरोपियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लिओ यिवु यांनी चीनमधील सध्याची सत्ताधारी राजवट, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व चीनच्या राजवटीला साथ देणार्‍या पाश्‍चात्य देशांमधील नेतृत्त्वावर सडकून टीका केली आहे. ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हुकुमशाही राजवटीत चीनचे भवितव्य खूपच निराशाजनक असल्याचे मला वाटते. ३० वर्षांपूर्वी आम्हाला वाटले होते की कदाचित चीनमध्ये लोकशाही विकसित होण्याच्या दिशेने प्रवास होईल. पण आता फक्त पैसा मिळविण्याचे उद्योग सुरू आहेत’, अशा शब्दात त्यांनी चीनमधील सत्ताधार्‍यांना लक्ष्य केले.

‘चीनमधील जे नागरिक नीतिमान जीवन जगत आहेत, त्यांना दुय्यम ठरवले गेले आहे आणि जे सत्ताधारी पक्षावर टीका न करता पैसे मिळवतात त्यांना हवे तसे जगण्याचा अधिकार मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट पक्षाच्या इतर नेत्यांची मुले अमेरिकेतील हार्वर्ड आणि इतर मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. नेत्यांची प्रेयसींना देखील अमेरिकी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी अनुदान दिले जाते’, अशा जळजळीत शब्दात त्यांनी सत्ताधारी राजवटीच्या भ्रष्ट नेत्यांवर कोरडे ओढले.

चीनच्या राजवटीवर टीकेचे आसूड ओढतानाच या राजवटीला साथ देणार्‍या पाश्‍चात्य देशांवरही सडकून टीका केली. ‘तिआनमेनमधील हत्याकांडानंतर सर्वच पाश्‍चात्य देशांनी चीनवर टीकास्त्र सोडले होते. आता हेच देश हत्याकांड घडविणार्‍या मारेकर्‍यांबरोबर व्यापार करण्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. त्याचवेळी हत्याकांड घडविणार्‍या मारेकर्‍यांकडून निष्पाप नागरिकांना पकडून मारण्याचे उद्योग सुरूच आहेत’, अशा खरमरीत शब्दात लिओ यांनी पाश्‍चात्य देशांचा दुटप्पीपणा उघड केला. हा दुटप्पीपणा उघड करतानाच तिआनमेनचे हत्याकांड हे चीनच्या इतिहासातील निर्णायक वळण आहे, याची जाणीवही या चिनी लेखकाने करुन दिली.

गेली आठ वर्षे बर्लिनमध्ये राहणार्‍या लिओ यांनी, पुन्हा चीनमध्ये परतणे ही आपल्यासाठी विशेष चिंतेची बाब नसल्याचे स्पष्ट केले. ‘मी मूळचा सिचुआनचा आहे आणि तिथे जाणे मला आवडेल. सिचुआन जेव्हा स्वतंत्र होईल, तेव्हा मी नक्कीच आनंदाने परत येईन’, असे सूचक उद्गार लिओ यांनी काढले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info