वॉशिंग्टन – मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात ‘युद्ध’ पुकारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. काही दिवसांपूर्वी मेक्सिकोत अमली पदार्थांचा व्यापार करणार्या टोळीने (कार्टेल) नऊ अमेरिकी नागरिकांची हत्या केली होती. या घटनेचे अमेरिकेत तीव्र पडसाद उमटले असून या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ‘कार्टेल्स’विरोधात युद्धाचे आवाहन करून अमेरिका मेक्सिकोला सहाय्य करेल, अशी ग्वाही दिली.
मेक्सिकोतील ‘चिहुआहुआ’ प्रांतातील ‘लेबॅरॉन’ कुटुंबाचा भाग असलेल्या नऊ जणांची ‘कार्टेल’कडून हत्या घडविण्यात आली होती. सदर कुटुंब अमेरिकी वंशाचे असून अमली पदार्थांचा व्यापार करणार्या टोळ्यांविरोधात सक्रिय होते, असे सांगण्यात होते. त्यामुळेच कार्टेलकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले असावे, असे सांगण्यात येते. कुटुंब प्रवास करीत असलेली गाडी पूर्णपणे जाळण्यात आली असून त्यातील सदस्यांची हत्या करून मग ती जाळली असावी, असा दावा करण्यात येतो.
अमेरिकी कुटुंबाच्या या क्रूर हत्येचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सदर हत्येची दखल घेत तीव्र शब्दात निर्भत्सना केली. त्याचवेळी मेक्सिकोतील अमली पदार्थांचा व्यापार करणार्या टोळ्या म्हणजे ‘मॉन्स्टर्स’ असल्याचा उल्लेख करून त्यांच्याविरोधात मेक्सिको सरकारने युद्ध पुकारावे, असे आवाहन केले. या युद्धासाठी अमेरिका आवश्यक ते सर्व प्रकारचे सहाय्य देईल, अशी ग्वाहीदेखील ट्रम्प यांनी दिली.
अमेरिकेतील संसद सदस्यांनीही मेक्सिकोत बळी गेलेल्या अमेरिकी नागरिकांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टॉम कॉटन यांनी, आता अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेऊन मेक्सिकोतील ‘कार्टेल्स’विरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे, असा इशारा दिला. तर सिनेटर बेन सॅसे यांनी, मेक्सिको आता ‘अपयशी राष्ट्रा’चा दर्जा मिळविण्याच्या अगदी नजिक पोहोचले आहे, अशी जळजळीत टीका केली.
….monsters, the United States stands ready, willing & able to get involved and do the job quickly and effectively. The great new President of Mexico has made this a big issue, but the cartels have become so large and powerful that you sometimes need an army to defeat an army!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 5, 2019
मेक्सिकोत अंमली पदार्थांचा व्यापार करणार्या गुन्हेगारी टोळ्यांचे जबरदस्त वर्चस्व आहे. मेक्सिकोत अशी १० प्रमुख ‘कार्टेल्स’ असून त्यातील पाचहून अधिक कार्टेल्सच्या प्रमुखांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र अशा प्रकारच्या कारवाईनंतरही मेक्सिकोतील हत्यांचे सत्र थंडावले नसल्याचे नव्या हत्याकांडावरून दिसून आले आहे. अमेरिकेच्या संसदेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या १२ वर्षात मेक्सिकोत झालेल्या हत्यांपैकी दीड लाखांहून अधिक हत्या या फक्त अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित होत्या.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |