दमास्कस – सिरियातील अलेप्पो व देर एझोर भागात इस्रायलने हवाईहल्ले चढविल्याचा दावा सिरियन संघटनेने केला. सोमवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये रासायनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रयोगशाळा व इराणकडून मिळालेल्या शस्त्रांचा साठा असणारे गोदाम यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. इस्रायलने गेल्या दोन आठवड्यात सिरियावर केलेला हा सातवा हल्ला आहे.
सोमवारी रात्री सिरियाच्या पूर्व भागातील अलेप्पो व देर एझोरमध्ये एकापाठोपाठ एक असे हल्ले चढविण्यात आले. अलेप्पोत करण्यात आलेल्या हल्ल्यांमष्ये इराणचे लष्कर व इराणसंलग्न दहशतवादी गटांच्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठ्याला लक्ष्य करण्यात आले. ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटना व वॉर मॉनिटरने ही माहिती दिली. हा शस्त्रसाठा सीरियन लष्कराच्या प्रयोगशाळांनजिक ठेवण्यात आला होता. या प्रयोगशाळांचा वापर रासायनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी केला जातो, असे दावे पाश्चात्य गुप्तचर संघटनांकडून करण्यात आले होते.
सीरियन वृत्तसंस्था ‘सना’ने अलेप्पोतील ‘अल-सफिरा’ भागात हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे. हे हल्ले लष्करी तळांवर व संशोधनकेंद्रांवर झाल्याचे सांगून सिरियाच्या हवाईसुरक्षा यंत्रणांनी काही हल्ले परतविल्याचाही दावा केला. सिरियन वृत्तसंस्थेने हे हल्ले इस्रायलनेच केल्याचेही म्हटले आहे. सिरियातील एका लष्करी अधिकाऱ्याने हल्ले करणारी इस्रायली लढाऊ विमाने ‘आलं-तन्फ’ भागातून आल्याचा दावा केला. सिरियातील हा भाग अमेरिकी लष्कराच्या ताब्यात आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |