नाटोने युक्रेनला सदस्य देश म्हणून स्वीकारायला हवे

- राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची मागणी

किव्ह/रॅमस्टेन – जुलै महिन्यात होणाऱ्या नाटोच्या बैठकीत युक्रेनला केवळ निमंत्रित म्हणून नाही तर सदस्य देश म्हणून स्वीकारायला हवे, अशी आक्रमक मागणी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केली. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग गुरुवारी युक्रेन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या सदस्यत्वाला नाटोने ‘फास्ट ट्रॅक’ प्रक्रियेद्वारे मान्यता द्यावी, असे आवाहन केले. नाटो प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून सर्व सदस्य देशांना युक्रेन सदस्य देश म्हणून मान्य आहे, असा दावा केला.

सदस्य देश

युक्रेन गेल्या काही वर्षांपासून नाटोत सामील होण्यासाठी धडपडत असून हाच मुद्दा युक्रेन व रशियातील तणावाला कारणीभूत ठरला आहे. युक्रेन कोणत्याही परिस्थितीत नाटोचा सदस्य देश बनणार नाही, असा खरमरीत इशारा रशियाने दिला आहे. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देणे ही रशियासाठी ‘रेड लाईन’ असेल, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्पष्ट शब्दात बजावले आहे. मात्र तरीही युक्रेनच्या सत्ताधारी राजवटीकडून नाटोतील प्रवेशासाठी हालचाली सुरू राहिल्याने व पाश्चिमात्य देशांनी त्याला समर्थन दिल्याने रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

सदस्य देश

गेल्या वर्षी रशियाने केलेल्या हल्ल्यानंतरही पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला नाटोत सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नाटोच्या विविध बैठकांमध्ये युक्रेनच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येत असून सदस्यत्वाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मात्र युरोपातील काही देशांनी याला विरोध केल्याने युक्रेनचा समावेश लांबणीवर पडल्याचे मानले जाते. वर्षभर सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा नजिकच्या काळात निकाल लागण्याची शक्यता नसून संघर्ष दीर्घकाळपर्यंत सुरु राहिल, असे दावे करण्यात येत आहेत.

सदस्य देश

या पार्श्वभूमीवर नाटोच्या प्रमुखांसह काही सदस्य देश पुन्हा एकदा सक्रिय झाले असून युक्रेनला सदस्य देश म्हणून सामील करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी रॅमस्टेनमध्ये झालेल्या बैठकीत नाटोची ‘प्रोक्युरमेंट एजन्सी’ असणाऱ्या ‘एनएसपीए’ व युक्रेन सरकारमधील सहकार्याला मंजुरी देण्यात आली. युक्रेनने याचे स्वागत करताना हा नाटोतील सहभागाच्या दृष्टिने महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेने युक्रेनच्या लष्करी तुकड्यांना अब्राम्स रणगाड्यांचे प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले आहे. पुढील आठवड्यापासून हे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिका युक्रेनला ३१ अब्राम्स रणगाडे देणार असून येत्या काही दिवसात हे रणगाडे जर्मनीत दाखल होणार आहेत. त्यानंतर युक्रेनी तुकड्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असे सांगण्यात येते. सुमारे २५० जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी अडीच महिने लागतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रशियाच्या लढाऊ विमानाने आपल्याच क्षेत्रात बॉम्ब टाकल्याची घटना उघड झाली आहे. रशियाच्या ‘एसयु-३४’ या लढाऊ विमानाने युक्रेन सीमेनजिक असलेल्या बेलगोरोद या शहराच्या भागात बॉम्ब टाकल्याचे समोर आले. रशियाच्या संरक्षण विभागाने घटनेला दुजोरा दिला असून हा अपघात असल्याचे म्हटले आहे.

English हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info