युरोपच्या समर्थनामुळे ग्रीस ‘दुसरा इस्रायल’ बनल्याचा तुर्की विश्लेषकाचा दावा

युरोपच्या समर्थनामुळे ग्रीस ‘दुसरा इस्रायल’ बनल्याचा तुर्की विश्लेषकाचा दावा

अथेन्स/इस्तंबूल – ‘भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्रीसच्या नेतृत्वाकडून राबविण्यात येणारी धोरणे इस्रायली नेत्यांप्रमाणे आहेत. युरोपिय महासंघाकडून ग्रीसला कायम व बिनशर्त समर्थन मिळत असून, ही बाब अमेरिकेकडून इस्रायलला मिळत असलेल्या पाठिंब्याशी साधर्म्य दाखविणारी आहे. ग्रीसदेखील भूमध्य सागरी क्षेत्रात इस्रायलप्रमाणेच अतिरेकी दावे करीत आहे’, या शब्दात तुर्की विश्लेषक तल्हा कोस यांनी ग्रीस हा दुसरा इस्रायल बनत असल्याचा ठपका ठेवला आहे. भूमध्य सागरी क्षेत्रातील अधिकारांच्या मुद्यावरून ग्रीस व तुर्कीमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्रीसने आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी आक्रमक पावले उचलली असून, त्याचा हवाला देऊन तुर्की विश्लेषकांनी ग्रीसची तुलना इस्रायलशी केली आहे.

'दुसरा इस्रायल'

ग्रीसमधील ‘पेंटापोस्टॅग्मा जीआर’ या न्यूज वेबसाईटने सदर वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘ग्रीस व फ्रान्समधील वाढते सहकार्य दोन्ही देशांसाठी वाईट बातमी घेऊन येणारे ठरू शकते. या क्षेत्रातील इतर कोणत्याही देशापेक्षा तुर्की हा लष्करीदृष्ट्या अधिक प्रबळ देश आहे. ग्रीस दुसऱ्या इस्रायल प्रमाणे कारवाया करीत असला तरी तुर्की म्हणजे पॅलेस्टाईन नाही. ग्रीसने तुर्कीच्या लष्करी क्षमतांची जाणीव ठेवावी’, असा इशाराही तुर्की विश्लेषक कोस यांनी दिला. तुर्कीचे सार्वभौमत्व व राष्ट्रीय हितसंबंधांना धक्का दिला तर तुर्कीच्या सामर्थ्याविरोधात कोणत्याही देशाला ग्रीसचा बचाव करता येणार नाही, असेही त्यांनी बजावले.

तुर्कीकडून आलेल्या या इशाऱ्यामागे फ्रान्स व ग्रीसमधील वाढते संरक्षण सहकार्य, युरोप व अमेरिकेने कडक शब्दात तुर्कीला दिलेली समज आणि ग्रीसने नव्या नौदल तळाबाबत केलेली घोषणा यांचा संदर्भ आहे. फ्रान्सने ग्रीसला १८ रफायल लढाऊ विमाने देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी, ग्रीसच्या कायदेशीर सार्वभौम अधिकारांसाठी युरोप ठामपणे उभा राहील, असा खणखणीत इशारा युरोपीय महासंघाकडून देण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकतीच ग्रीसला भेट देऊन, तुर्कीविरोधातील वादात अमेरिका ग्रीसच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आपली ‘यूएसएस हर्शेल वुडी विल्यम्स’ ही ‘एक्सपीडीशनरी सी बेस’ प्रकारातील युद्धनौका ग्रीसच्या नौदल तळावर तैनात करणार असल्याचेही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यानी जाहीर केले.

'दुसरा इस्रायल'

अमेरिका व युरोपकडून भक्कम समर्थन मिळत असतानाच ग्रीसने आपण क्रेटे बेटावर नवा नौदल तळ उभारणार असल्याची घोषणा केली आहे. ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोस पॅनागिओटोपलस यांनी संसदेत ही माहिती दिली. भूमध्य सागरी क्षेत्रातील ग्रीसची संरक्षण क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रीक संरक्षणमंत्र्यानी सांगितले. सध्या क्रेटे बेटावरील ‘सौदा बे’ भागात ग्रीसचा नौदल तळ कार्यरत असून, याच भागात अमेरिका व नाटोचा तळही सक्रिय आहे.

'दुसरा इस्रायल'

ऑगस्ट महिन्यात तुर्कीने आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात, ग्रीसच्या कॅस्टेलोरीझो बेटानजिक संशोधनासाठी दाखल होत असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीससह युरोपीय देश व नाटोकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ग्रीसने आपला संरक्षणदलांना हाय अलर्ट जारी करत तुर्कीच्या कारवायांची टेहळणी सुरू केली होती. त्यापाठोपाठ ग्रीसने फ्रान्सबरोबर भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त नौदल सरावही केला होता. त्याचवेळी आपल्या मोहिमेचे समर्थन करण्यासाठी तुर्कीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती सुरू करून एकापाठोपाठ एक युद्धसराव आयोजित केले होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इतिहासाचे दाखले देत युरोपीय देशांना धमकावण्यासही सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर, ग्रीसची वाढती संरक्षणसज्जता व तुर्कीकडून इस्रायलचा उल्लेख करून देण्यात आलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info