पॅरिस/नीस – फ्रान्सच्या नीस शहरात प्रार्थनास्थळानजिक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला आहे. हा हल्ला कट्टरपंथीयांनी केल्याचे उघड झाले असून हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती सुरक्षयंत्रणांनी दिली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, देशातील सुरक्षेसाठी सात हजार लष्करी जवान तैनात करण्याची घोषणा केली आहे. फ्रान्स सरकारने देशाच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याची पातळी ‘इमर्जन्सी’पर्यंत वाढविली आहे. नीसमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा फ्रान्समध्ये या महिन्यात झालेला तिसरा दहशतवादी हल्ला ठरला आहे.
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास, नीसमधील प्रार्थनास्थळानजिक एका कट्टरपंथियाने चाकूहल्ला चढविला. या हल्ल्यात प्रार्थनास्थळातील दोन जणांसह नजिकच्या परिसरातील एकाचा बळी गेला. यात एका महिलेचाही समावेश असून हल्लेखोराने तिचा शिरच्छेद केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांनी तातडीने कारवाई करून हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. नीसचे मेयर ख्रिस्तियन एस्ट्रोसी यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याची माहिती दिली असून, फ्रेंच दहशतवादविरोधी पथकाने त्याचा तपास सुरू केला आहे.
या हल्ल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नीसला भेट दिली. यावेळी मॅक्रॉन यांनी देशातील सुरक्षेसाठी तैनात लष्करी जवानांची संख्या वाढविण्याचे जाहीर केले. येत्या काही दिवसात फ्रान्समधील प्रार्थनास्थळे व शाळांसह महत्त्वाच्या ठिकाणी सात हजार जवान तैनात करण्यात येतील, असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितले. फ्रान्सच्या सुरक्षेला असलेला धोका ‘इमर्जन्सी लेव्हल’पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती पंतप्रधान जीन कास्टे यांनी दिली आहे. सध्या फ्रान्समध्ये तीन हजार लष्करी जवान तैनात आहेत.
फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून त्याचा निषेध करण्यात येत आहे. भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हल्ल्याची निंदा करून, या क्षणी आपण फ्रान्सबरोबर असल्याचे म्हटले आहे. नाटोनेही आपण ठामपणे फ्रान्सच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून फ्रान्स सातत्याने दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य होत असल्याचे समोर आले आहे. २०१५ सालापासून आतापर्यंत फ्रान्समध्ये किमान १० मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |