इदलिब/अंकारा – गेल्या आठवड्यात रशियन लढाऊ विमानांनी चढविलेल्या आक्रमक हवाईहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीने उत्तर सिरियातील ‘शिर मघार’ या लष्करी तळावरून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीकडून इदलिबमधील सर्वात मोठा तळ असणाऱ्या ‘मोरेक’मधूनही माघार घेतली होती. तुर्कीने गेल्या काही वर्षात सिरियासह लिबिया, ग्रीस, सायप्रस, पॅलेस्टाईन व आर्मेनिया-अझरबैजान मुद्यांवर मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू केला होता. सिरियावरून तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी रशिया व अमेरिकेला धमकावण्यासही सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर तुर्कीने माघारीस सुरुवात करणे लक्षवेधी ठरते.
तुर्कीने २०१८ साली आपल्या सिरियातील कारवायांची व्याप्ती वाढविताना इदलिब व नजिकच्या परिसरात जवळपास १२ लष्करी तळ व ‘आऊटपोस्ट्स’ उभारले होते. या तळांवर तुर्कीचे १० ते १५ हजार जवान तैनात करण्यात आले होते. तुर्कीसमर्थक दहशतवादी गटांच्या सदस्यांना प्रशिक्षण तसेच आश्रय देण्यासाठीही या तळांचा वापर करण्यात येत होता. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला रशियासमर्थक सिरियन लष्कराने इदलिबनजिकच्या भागात धडक मारून अनेक महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली होती. त्यामुळे तुर्कीसमर्थक गटांसह तुर्कीच्या लष्करालाही झटका बसला होता. त्यानंतर रशिया व तुर्कीमध्ये या क्षेत्रात संघर्षबंदी करार झाला होता.
करारानंतरही तुर्की व समर्थक दहशतवादी गटांकडून या भागात कारवाया सुरू असल्याचे दावे सिरियन सरकारकडून करण्यात आले होते. या क्षेत्रात तुर्कीच्या सीमेजवळ ‘फयलाक अल-शाम’ या दहशतवादी संघटनेचे मोठे तळ असून या ठिकाणी दहशतवाद्यांची भरतीही केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये तुर्कीने सिरियातील अस्साद राजवटीविरोधातील संघर्षात ‘फयलाक’च्या दहशतवाद्यांचा मोठा वापर केला आहे. लिबियातील संघर्षातही याच गटातील दहशतवाद्यांना उतरविले होते. गेल्या काही आठवड्यांपासून आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या युद्धातही तुर्कीने ‘फयलाक’च्या दहशतवाद्यांना आर्मेनिया विरोधात तैनात केल्याचा दावा करण्यात येतो. लिबिया तसेच आर्मेनिया-अझरबैजान युद्धात तुर्कीने केलेला दहशतवाद्यांचा वापर आणि आक्रमक भूमिका रशियाच्या नाराजीचे कारण ठरली आहे.
तुर्कीच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने गेल्या आठवड्यात इदलिबमध्ये जबरदस्त हवाईहल्ला चढविला होता. हा हल्ला तुर्कीला मोठा हादरा ठरला आहे. तुर्कीने या हल्ल्यावरून रशियाला धमकावले असले, तरी ही धमकी खरी करण्याची क्षमता तुर्कीत नाही. सध्या तुर्की लिबिया बरोबरच ग्रीस व अझरबैजानच्या आघाड्यांवर चांगलाच अडकला आहे. तुर्कीची अर्थव्यवस्थाही सध्या अडचणीत आली आहे.
अशा स्थितीत आधीच दणके बसलेल्या सिरियात नवी आघाडी उघडण्याऐवजी तुर्कीने माघारीचा पर्याय निवडल्याचे मोरेक व शिर मघारमधील पिछेहाटीवरून दिसून येते. सिरियन लष्कराने या तळांचा ताबा घेतला असून, तुर्कीला अजून काही तळ सोडणे भाग पडेल, असे संकेतही सूत्रांनी दिले आहेत. सिरियातून सुरू झालेली ही पिछेहाट तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या महत्त्वाकांक्षांना मिळालेला मोठा धक्का असल्याचे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |