गाझातील हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे जोरदार हवाई हल्ले

गाझातील हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे जोरदार हवाई हल्ले

जेरूसलेम – गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री इस्रायलच्या सीमाभागात दोन रॉकेट हल्ले चढविले. इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यंत्रणेने हे रॉकेट यशस्वीरित्या भेदले. त्यानंतर शनिवारी पहाटे इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवून मोठी कारवाई केली. या कारवाईत हमासचे मोठे नुकसान झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली.

शुक्रवारी रात्री इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांमध्ये ख्रिसमस साजरा होत असताना हमासच्या रॉकेट हल्ल्यांमुळे नागरिकांची धावपळ झाली. रॉकेट हल्ल्यानंतर अश्‍केलॉन, झिकिम, नेतीव्ह, हासरा या शहरांमध्ये सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी बचावासाठी सुरक्षित बंकर्समध्ये धाव घेतली. इस्रायलच्या स्थानिक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, इथे कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. पण हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या लष्कराने मध्य गाझापट्टीतील हमासच्या तीन मोठ्या ठिकाणांना लक्ष्य केले. हमाससाठी रॉकेटनिर्मिती करणारा कारखाना, हमासचा लष्करी तळ आणि भुयारी बांधकाम इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जमिनदोस्त झाले.

इराण व इराणसंलग्न हमास, हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ल्याची तयारी करीत आहेत. या संघटनांनी अमेरिकेसह इस्रायलच्या देखील हितसंबंधांवर हल्ले चढविणार असल्याच्या धमक्या दिल्या आहेत. तर इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना उत्तर देण्यासाठी आपली संपूर्ण तयारी झालेली असल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info