वॉशिंग्टन/तेहरान/जेरूसलेम – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. त्याबरोबर इराणने आपल्या आक्रमकतेतही वाढ केली आहे. युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर इराणने एक हजार सेंट्रीफ्यूजेस बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख अली अकबर सालेही यांनी ही घोषणा केली. तर आक्रमक बनलेल्या इराणला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराणवर नवे निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने पावले टाकून जागतिक सुरक्षेला आव्हान देणार्या इराणला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट करावी, असे आवाहन इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केले आहे.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाला अवघ्या १४ दिवसांचा कालावधी आहे. त्यानंतर अमेरिकेतील बायडेन यांचे प्रशासन आपल्याला अनुकूल असेल, असा विश्वास इराणला वाटू लागला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत केलेल्या घोषणा त्याचाच एक भाग असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी इराणने फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू केली.
२०१५ साली इराण आणि पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या अणुकराराचे हे उल्लंघन ठरत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. तर या निर्णयामुळे इराणने भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचेही अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. युरेनियमचे संवर्धन वाढवून इराण अणुकराराच्या पुनरुजीवनाचे मार्ग बंद करीत असल्याची टीकाही विश्लेषकांनी केली. पण इराणने युरेनियमच्या संवर्धनाबाबत घेतलेले पाऊल मागे घ्यावे, असे वाटत असेल तर जुनाच करार पुन्हा लागू करावा, अशी अट इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी ठेवली.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या अटीवर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि युरोपिय देशांकडून प्रतिक्रिया येण्याआधीच इराणने मंगळवारी आणखी एक घोषणा केली. इराण आपल्या अणुप्रकल्पात एक हजार ‘आयआर-२एम’ सेंट्रिफ्यूजेस बसवित आहे. याचे दोन कॅस्केड बसवून झाल्याची माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख सालेही यांनी दिली. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षात इराणने संवर्धित युरेनियमची निर्मिती ३० टनपर्यंत नेली आहे व या वर्षअखेरीपर्यंत यात पाच ते दहा टनची वाढ होईल, असा दावा सालेही यांनी केला. सेंट्रीफ्यूजेसबाबत इराणने केलेल्या घोषणेला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणवर नव्या निर्बंधांची घोषणा केली. इराणच्या १२ स्टिल कंपन्यांवर अमेरिकेने हे निर्बंध लादले आहेत. ‘दहशतवादाचा प्रायोजक असणारा आणि संहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार्या इराणला कुठल्याही प्रकारे आर्थिक सहाय्य मिळणार नाही, यासाठी ट्रम्प प्रशासन वचनबद्ध आहे’, असे अमेरिकेचे कोषागार मंत्री स्टिव्ह एम्नुकिन म्हणाले.
आखाती क्षेत्रात दहशतवाद माजविणार्या आणि अण्वस्त्रसज्जतेकडे पावले टाकणार्या इराणविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने हात मिळविण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केले. त्याचबरोबर इस्रायलच्या संरक्षणदलांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |