जेरूसलेम – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर पुन्हा अणुकरार करण्याचे संकेत दिले होते. त्यावर इस्रायलकडून प्रतिक्रिया उमटली आहे. अणुकरारातील सर्वच अटी मान्य करण्याची तयारी इराणकडून दाखविली जात नाही, तोपर्यंत इराणवरील निर्बंध मागे घेण्याची चूक बायडेन प्रशासनाने करू नये, असा खरमरीत इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला आहे. त्याचवेळी इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणपासून इस्रायल व अरब देशांना असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना केले आहे.
बुधवारी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी केलेल्या भाषणात बायडेन यांनी अमेरिकेच्या मित्रदेशांना पुन्हा एकत्र आणण्याची घोषणा केली. तर या शपथग्रहाणच्या काही तास आधी बायडेन यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून घोषित केलेले अँथनी ब्लिंकन यांनी इराणबरोबर अणुकरार करण्याआधी अमेरिका आखातातील इस्रायल आणि अरब मित्रदेशांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. इराण अमेरिकेच्या मागण्या मान्य करणार असेल तर अमेरिका देखील इराणबरोबर अणुकरार करण्यास तयार असल्याचे ब्लिंकन यांनी सिनेटच्या फॉरेन रिलेशन्स कमिटीसमोर सांगितले होते.
इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत बायडेन यांच्या प्रशासनाने स्वीकारलेल्या या भूमिकेवर इस्रायलकडून प्रतिक्रिया उमटली आहे. बायडेन प्रशासनाबरोबर अणुकरारासाठी उत्सुक असलेल्या इराणपासून इस्रायल आणि अरब देशांना धोका वाढल्याची आठवण नेत्यान्याहू यांनी करुन दिली. इराणच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेने इस्रायल तसेच अरब देशांना सहकार्य करावे, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी केले. तसेच इस्रायल आणि अरब देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित झाल्याचेही नेत्यान्याहू यांनी लक्षात आणून दिले.
पण बायडेन प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेल्या या भूमिकेवर आवाहन करणार्या पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आपल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीद्वारे अमेरिकेला इशारा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इराणने नव्या अणुकरारासंबंधीच्या अटी मान्य केल्याशिवाय इराणला निर्बंधांतून मुक्त करण्याची चूक बायडेन प्रशासनाने करू नये, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सदर बैठकीत बजावले आहे. इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्याने स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली.
अटी मान्य केल्याशिवाय इराणवरील निर्बंध मागे घेतले तर ते या देशासाठी ईनाम ठरेल. यानंतर इराण अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशाच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाही. गेल्या अनुभवातून आपण शिकले पाहिजे, असे संबंधित वरिष्ठ अधिकार्याने म्हटले आहे. पण यानंतरही बायडेन प्रशासनाने इराणबरोर अणुकरार केलाच तर यापुढे अमेरिका आणि इस्रायल यांच्यात कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे स्थानिक वृत्तवाहिनीने इस्रायली अधिकार्याच्या हवाल्याने सांगितले आहे.
दरम्यान, बायडेन यांच्या प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार करू नये, यासाठी इस्रायल तसेच सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेश एकत्र आले आहेत. हे देश एकत्र येऊन बायडेन प्रशासनावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |