मॉस्को – ‘दुसरे महायुद्ध पेटण्याच्या आधीचा १९३० चा काळ आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मोठे साम्य आहे. या काळात समस्या सोडविता न आल्याने दुसरे महायुद्ध भडकले होते. आत्ताच्या काळात असा संघर्ष पेटला तर जग नष्टप्राय होण्याची भीती आहे. आर्थिक विषमता, राजकीय कट्टरता आणि आंतरराष्ट्रीय तणाव यातून संघर्षचा नियंत्रण ठेवता न येण्याजोगा भडका उडू शकतो’, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. त्याचवेळी लोकनियुक्त सरकारांसमोर तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे आव्हान खडे ठाकले आहे, असे सांगून रशियन राष्ट्राध्यक्षांनी या कंपन्यांवर सडकून टीका केली.
एका दशकाहून अधिक काळानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांनी डॅव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला संबोधित केले. व्हर्च्युअल माध्यमातून त्यांनी जग विनाशकारी संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची जाणीव करून दिली. १९३० सालादरम्यान आंतरराष्ट्रीय समस्या सोडविता न आल्याने दुसरे महायुद्ध भडकले होते. त्यावेळची स्थिती व आत्ताची परिस्थिती यात खूप मोठे साम्य असल्याचे सांगून अशा काळात हातावर हात धरून स्वस्थ बसता येणार नाही, असे रशियन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले. जगाचा कारभार चालविणार्या आंतरराष्ट्रीय संस्था दुबळ्या बनत चालल्या आहेत. क्षेत्रिय समस्यांचा गुणाकार होऊन त्यात वाढ होत आहे आणि अशा काळात जागतिक सुरक्षा व्यवस्था ढासळत आहे, अशा शब्दात रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपली चिंता व्यक्त केली.
यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्षाचा भडका उडून सारी मानवता नष्ट होण्याचा धोका बळावला आहे, असा इशारा व्लादिमिर पुतिन यांनी दिला. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवाद व सहकार्य वाढविणे आवश्यक आहे. अमेरिका व रशियाने ‘स्टार्ट’ कराराची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला, हे या दिशेने टाकण्यात आलेले सकारात्मक पाऊल ठरते, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढे म्हणाले. आपल्या या भाषणात पुतिन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांवर जोरदार टीका केली. या कंपन्या देशांमधील लोकनियुक्त सरकारशी टक्कर घेऊन त्यांना आव्हान देऊ लागल्या आहेत. या कंपन्यांची एकाधिकारशाही लोकशाही व्यवस्थेसाठी पर्याय बनत चालली असून यामुळे एकाधिकारशाहीच्या तंत्राने चालणार्या सामाजिक रचनेचा धोका संभवतो. अशा समाजात कसे जगायचे, कुठला पर्याय निवडायचा आणि कोणती भूमिका व्यक्त करायची, याच्या स्वातंत्र्यावरच गदा येईल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले आहे.
याचा दाखला देताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ‘अमेरिकेत काय घडले, ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे’, असे सूचक विधान केले. अमेरिकेतील तंत्रज्ञान व सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात खड्या ठाकल्या होत्या. त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात पक्षपाती भूमिका स्वीकारल्याचे आरोप झाले होते. हीच बाब ट्रम्प यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा दावा काहीजणांकडून केला जातो. थेट उल्लेख न करता रशियन राष्ट्राध्यक्षांनी याचा संदर्भ आपल्या भाषणात दिला.
तसेच सध्या रशियन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात सध्या निदर्शने सुरू असून त्याला विशेष प्रसिद्धी दिली जात आहे, याबाबतची नाराजीही रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या उद्गारांमधून व्यक्त होत असल्याचे दावे काही वृत्तसंस्था करीत आहेत. दरम्यान, रशियावर काही देशांकडून लादण्यात येत असलेल्या एकतर्फी आर्थिक निर्बंधांच्या विरोधातही रशियन राष्ट्राध्यक्षांनी इशारा दिला आहे. असे व्यापारी अडथळे, अवैध आर्थिक व तंत्रज्ञानविषयक तसेच माहितीच्या संदर्भातील निर्बंध लष्करी कारवाईला आमंत्रण देऊ शकतात व ही लष्करी कारवाई सर्वांसाठीच घातक बाब ठरेल, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |