अफगाणिस्तानात तालिबानचे हंगामी सरकार रक्तरंजित हिंसाचारास कारणीभूत ठरेल – राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचे टीकास्त्र

अफगाणिस्तानात तालिबानचे हंगामी सरकार रक्तरंजित हिंसाचारास कारणीभूत ठरेल – राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचे टीकास्त्र

काबुल – तालिबानचे हंगामी सरकार अफगाणिस्तानातील रक्तपातास कारणीभूत ठरेल, अशी टीका राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी केली आहे. त्याचवेळी अमेरिकेने सैन्यमाघारीची घाई करू नये, उलट अमेरिका व नाटोने तालिबानकडून सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी मागणीही राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केली. अमेरिका व तालिबानमधील शांतीकरार पुढील महिन्यात संपुष्टात येत असून, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यावर फेरविचाराचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी तालिबान इराण व अल कायदाच्या सहाय्याने अफगाणिस्तानात पुन्हा हिंसक संघर्षाची तयारी करीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेतील ‘अ‍ॅस्पेन इन्स्टिट्यूट’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानकडून सुरू असलेल्या हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘गेल्या वर्षी अमेरिका व तालिबानमध्ये करार झाल्यानंतर अफगाणिस्तानमधील संघर्ष कमी होईल, असे आश्‍वासन अमेरिकेने दिले होते. मात्र प्रत्यक्षात हिंसाचाराची तीव्रता अधिकच वाढल्याचे दिसत आहे. शांतीचर्चा पुढे नेण्यासाठी तालिबान काहीच हालचाल करीत नसून उलट ती टाळण्यासाठी नवनवी कारणे शोधण्यात येत आहेत. तालिबानने अफगाणी लष्करावर केलेले हल्ले तसेच राजकीय नेत्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारायलाच हवी’, या शब्दात राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानला लक्ष्य केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी अमेरिका व तालिबानमध्ये तात्पुरता शांतीकरार झाला होता. या करारानुसार, अमेरिका अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेणार असून तालिबान हिंसाचार थांबवून अफगाण सरकारबरोबर शांतीप्रक्रियेत सहभागी होईल, असे ठरले होते. अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले असले तरी तालिबानने आपले हल्ले थांबविलेले नाहीत. उलट आपण अमेरिका व नाटोला पराभूत केल्याची दर्पोक्ती करून तालिबानने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

गेल्या काही दिवसात अल कायदा या दहशतवादी संघटनेसह इराणबरोबरील तालिबानचे संबंध अधिक मजबूत झाल्याची माहिती समोर आली आहे. तालिबानचा भाग असलेले ‘हक्कानी नेटवर्क’ अल कायदाच्या सहाय्याने नवा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी अफगाण तालिबानची इराणबरोबर चर्चा सुरू असून अमेरिकेविरोधात पुन्हा संघर्ष छेेडण्याची तयारी सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अफगाणिस्तानात पुन्हा एकदा रक्तरंजित हिंसाचाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून राष्ट्राध्यक्ष गनी यांचे वक्तव्य त्याचेच संकेत देत आहे.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info