वॉशिंग्टन – आर्क्टिक क्षेत्रातील रशियाचे वाढते संरक्षणतळ व आक्रमक हालचाली रोखण्यासाठी अमेरिकेने नॉर्वेतील हवाईतळावर ‘बी-१ बॉम्बर्स’ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी परराष्ट्र धोरणाची रुपरेखा मांडताना, रशियाविरोधातील धोरण अधिक आक्रमक करण्याची ग्वाही दिली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी’ स्वीकारून चीनसह इराण, युरोपिय देश व मित्रदेशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी ट्रम्प यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी असलेली जवळीकही वादाचा विषय ठरली होती. बायडेन यांनी मात्र आपले रशिया धोरण पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे गुळमुळीत असणार नसल्याचा इशारा दिला. ‘रशियासारखा देश आपली लोकशाही उधळण्यासाठी हालचाली करीत आहे. आपण आपल्या पूर्वसुरीप्रमाणे रशियासमोर लोळण घेणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते.
नॉर्वेत बॉम्बर्स विमाने पाठविण्याचा निर्णय त्याचाच भाग ठरतो. येत्या आठवड्याभरात अमेरिकेची चार ‘बी-१ बॉम्बर्स’ विमाने नॉर्वेतील ‘ऑरलँड’ तळावर दाखल होणार आहेत. या विमानांबरोबरच २०० जवानांची तुकडीही नॉवेतील तळावर तैनात करण्यात येणार आहे. बॉम्बर्स विमानांच्या तैनातीची पूर्वतयारी करण्यासाठी हवाईदलाची छोटी तुकडी नॉर्वेत आधीच दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेने स्वतंत्ररित्या नॉर्वेतील तळांवर ‘बॉम्बर्स’ विमाने तैनात करण्याची ही पहिलीच वेळ ठरते.
अमेरिकेच्या ‘बॉम्बर्स टास्क फोर्स’तर्फे यापूर्वी युरोपात मोहिमा राबविण्यात आल्या असल्या तरी त्यातील बहुतांश मोहिमा ब्रिटनमधील तळावर तैनात ‘बॉम्बर्स’च्या माध्यमातून पार पडल्या होत्या. काही मोहिमांमध्ये अमेरिकेतून बॉम्बर्स थेट युरोपात दाखल होऊन मोहीम पार पाडून माघारी धाडण्यात आले होते. मात्र नॉर्वेतील तळावर स्वतंत्ररित्या तैनाती होणार असून ही बॉम्बर्स आर्क्टिक क्षेत्रातील सराव व मोहीम पूर्ण करतील, अशी माहिती युरोपमधील ‘युएस फोर्सेस’च्या अधिकार्यांनी दिली.
ही तैनाती रशियाच्या आक्रमक हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व नॉर्वेतील वाढत्या संरक्षण सहकार्याचा भाग असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. पुढील काळात अमेरिका आपल्या पाणबुड्याही नॉर्वेतील नौदल तळावर तैनात करण्यासाठी पाठविणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी आर्क्टिक क्षेत्रात पार पडलेल्या युद्धसरावात अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका धाडली होती, याची आठवणही अमेरिकी अधिकार्यांनी यावेळी करून दिली.
रशियाने गेल्या काही वर्षात आर्क्टिकमधील संरक्षणतळांची संख्या व त्यावरील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढवली होती. रशियन लढाऊ विमाने व पाणबुड्यांचा वाढता वावर युरोपिय देशांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर, बायडेन यांनी आक्रमक धोरणाचे संकेत देऊन रशियाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |