चलनाच्या विक्रमी घसरणीनंतर लेबेनॉनमध्ये हिंसक निदर्शनांचा भडका

चलनाच्या विक्रमी घसरणीनंतर लेबेनॉनमध्ये हिंसक निदर्शनांचा भडका

बैरुत – आखातातील लेबेनॉनचे चलन असणार्‍या ‘लेबेनिज पौंड’मध्ये विक्रमी घसरण झाली असून देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी राजधानी बैरुतसह अनेक शहरांमध्ये निदर्शनांचा भडका उडाला असून निदर्शकांच्या गटाने थेट संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत धडक मारल्याचे वृत्त देण्यात आले आहे. गेले दीड वर्षे लेबेनॉन राजकीय अस्थैर्याला तोंड देत आहे. त्यात कोरोनाची साथ व ‘बैरुत पोर्ट ब्लास्ट’ची भर पडल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. आता चलनातील विक्रमी घसरणीमुळे अर्थव्यवस्था कोसळण्याचे संकट निर्माण झाले असून ही बाब गेल्या शतकातील गृहयुद्धानंतरचा सर्वात मोठा धोका ठरेल, असा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे.

विक्रमी घसरण

गेल्या काही महिन्यात लेबेनीज पौंडचे मूल्य जवळपास ८० टक्क्यांनी घसरले आहे. मात्र शुक्रवारी झालेली घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ठरली आहे. शुक्रवारी एका अमेरिकी डॉलरसाठी तब्बल १२,५०० लेबेनीज पौंड मोजावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकृत पातळीवर हा दर केवळ दीड हजार पौंड दाखविण्यात येत असले तरी या दराने डॉलर उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते. चलनाच्या प्रचंड घसरणीमुळे जनतेत प्रचंड असंतोषाची भावना असून हा राग निदर्शनांच्या रुपात बाहेर पडल्याचे दिसून आले. राजधानी बैरुतमध्ये निदर्शकांच्या गटांनी सरकारविरोधात घोषणा देत थेट संसदेवर धडक मारली. यावेळी संसदेच्या प्रवेशद्वारावर चढून आतमध्ये घुसण्याचाही प्रयत्न झाला. मात्र सुरक्षादलांनी हा प्रयत्न हाणून पाडला. चिडलेल्या निदर्शकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक व नासधूस केल्याचे समोर आले आहे. राजधानी बैरुतव्यतिरिक्त सिडॉन, तायरे व त्रिपोली यासारख्या शहरांमध्येही हिंसक निदर्शने सुरू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

ऑक्टोबर २०१९ पासून लेबेनॉनला अस्थैर्याने ग्रासले असून राजकीय पक्षांमधील मतभेद व संघर्षामुळे देशाला अद्यापही स्थिर सरकार मिळालेले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था अधिकाधिक रसातळाला चालल्याचे दिसत आहे. त्यातच कोरोनाव्हायरसची साथ व ऑगस्ट महिन्यात बैरुत बंदरावर झालेला भीषण स्फोट यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. २०२० साली लेबेनीज अर्थव्यवस्था तब्बल १९ टक्क्यांनी घसरली आहे. देशावरील कर्जाचा बोजा ९० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला असून ही रक्कम जीडीपीच्या १७० टक्के इतकी प्रचंड आहे. लेबेनीज सरकार कर्जांची परतफेड करण्यातही अपयशी ठरले आहे.

विक्रमी घसरणविक्रमी घसरणविक्रमी घसरण

अमेरिका, फ्रान्स व काही युरोपिय देशांकडून लेबेनॉनला सहाय्य करण्यात येत असले, तरी हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस ले ड्रिआन यांनी, लवकर तोडगा निघाला नाही तर लेबेनॉन पूर्णपणे कोसळण्याची भीती आहे, असे बजावले. अंतर्गत परिस्थिती टोकाला पोहोचली असतानाच लेबेनॉनमधील प्रभावशाली राजकीय संघटना ‘हिजबुल्लाह’ इस्रायलविरोधात संघर्षाच्या धमक्या देत असल्याचे समोर येत आहे. इस्रायलनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले असून, इस्रायलच्या कारवाईने लेबेनॉन देखील हादरून जाईल, असा खरमरीत इशारा दिला आहे.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info