अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये आण्विक युद्धाचा भडका उडेल – आंतरराष्ट्रीय विश्‍लेषिकांचा इशारा

अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये आण्विक युद्धाचा भडका उडेल – आंतरराष्ट्रीय विश्‍लेषिकांचा इशारा

अण्वस्त्रसज्ज

लंडन – ‘अण्वस्त्रसज्ज देश आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत अधिक भर घालत आहेत. ही अण्वस्त्रे वापरण्याकरिता सुरू झालेली तयारी ठरते. अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये निर्माण झालेला तणाव वाढत चालला असून पुढच्या काळात जागतिक महायुद्ध पेट घेऊ शकते. तसे झाले तर अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये आण्विक युद्धाचा भडका उडाल्यावाचून राहणार नाही’, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषिका डॉ. पॅट्रिशिया लुईस यांनी दिला आहे. आपल्या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी डॉ. पॅट्रिशिया यांनी उत्तर कोरियाचा दाखला दिला.

२०१८ साली उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचा अलर्ट जारी करण्यात आला होता. पॅसिफिक महासागर क्षेत्रातील हवाई बेटावरील कर्मचार्‍याने हा खळबळ उडवून देणारा अलर्ट जारी केला होता. हवाई बेटांवरील मोबाईल्स, रेडिओ आणि वृत्तवाहिनींवर हा अलर्ट गेला होता. सदर कर्मचार्‍याने आपण याबाबत शंभर टक्के ठाम असल्याचा दावा केला होता. यामुळे किमान ४० मिनिटांसाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. पण सुरक्षा यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर हा ‘फॉल्स अलार्म’ असल्याचे निष्पन्न झाले होते.

या एका घटनेमुळे संबंधित क्षेत्रात अणुयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तर कोरियाचे शेजारी दक्षिण कोरिया, जपान या देशांच्या सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होत्या. उत्तर कोरियाबाबत घडलेली ही घटना येत्या काळासाठी फार मोठे उदाहरण असल्याचे डॉ. पॅट्रिशिया यांनी ब्रिटिश रेडिओवाहिनीशी बोलताना सांगितले. सध्याच्या युगात एखादी माहिती वेगाने प्रसारित केली जाते. पण तणावाच्या काळात चुकीचा अर्थ लावणारी, गैरसमज वाढविणारी माहिती प्रसारित केली गेली तर अण्वस्त्रसज्ज असणार्‍या देशांमध्ये तणाव वाढून जागतिक महायुद्ध पेट घेऊ शकते, असा इशारा डॉ. पॅट्रिशिया यांनी दिला.

यासाठी डॉ. पॅट्रिशिया यांनी शीतयुद्धाची आठवण करून दिली. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोनच देशांकडे मोठ्या संख्येने अण्वस्त्रे होती. शीतयुद्धानंतर अमेरिका व रशियातील तणाव कमी झाला आहे. पण या दोन्ही देशांमध्ये त्याकाळात निर्माण झालेला तणाव हा सध्याच्या काळातील तणावापेक्षा फारच कमी होता, असा दावा डॉ. पॅट्रिशिया यांनी केला.

सध्या अमेरिका व रशियावगळता इराण, इस्रायल, पाकिस्तान, भारत आणि उत्तर कोरिया या देशांकडेही कमी संख्येने अण्वस्त्रे आहेत. संख्येने कमी अण्वस्त्रे असलेल्या यातील काही देशांनी दुसर्‍या देशाविरोधात अण्वस्त्रे वापरण्याची धमकीही दिली आहे, असे डॉ. पॅट्रिशिया म्हणाल्या. त्यामुळे येत्या काळात या देशांमधील तणाव वाढला आणि उत्तर कोरियासारखी परिस्थिती निर्माण झाली तर या अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये आण्विक युद्धाचा भडका उडेल, असा इशारा डॉ. पॅट्रिशिया यांनी दिला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info