इस्रायलच्या मोसादमुळे इराणची राजवट हादरली – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

इस्रायलच्या मोसादमुळे इराणची राजवट हादरली – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन – गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणेने इराणमध्ये केलेले हल्ले व स्फोट, ह्यामुळे इराणच्या राजवटीची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे, असा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने केला आहे. इराणी नेते आणि इराणविषयक विश्‍लेषकांच्या हवाल्याने अमेरिकी वर्तमानपत्राने हा दावा केला. इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या या कारवायांसाठी इराणमधून मिळणारे सहाय्य व अशा इराणींवर कारवाई करण्यात आलेले अपयश, यामुळे इराणची राजवट हादरल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

दहा दिवसांपूर्वी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेला स्फोट हा इस्रायलनेच घडविल्याचा आरोप इराण करीत आहे. या हल्ल्यासाठी रेझा करिमी या स्थानिक इराणी नागरिकाने इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ला सहाय्य केल्याचे इराणच्या यंत्रणांनी म्हटले होते. या हल्ल्याआधी करिमीने इराणमधून पलयान केले असून इराणच्या यंत्रणा करिमीचा शोध घेत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या स्फोटामुळे इराणची गुप्तचर व सुरक्षा यंत्रणेतील कमतरता ठळकपणे समोर आल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

यासाठी अमेरिकी वर्तमानपत्राने गेल्या नऊ महिन्यांमध्ये इराणमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला दिला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इराणची राजधानी तेहरानमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोराने अल कायदाचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला उर्फ अबू मुहम्मद अल-मसरी याला राजधानी तेहरानमध्ये दिवसाढवळ्या ठार केले. अद्याप या हल्लेखोराचा पत्ता लागलेला नाही, याची आठवण अमेरिकी वर्तमानपत्राने करून दिली. मसरी याला इराणच्या राजवटीने आश्रय दिला होता. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी इराणच्या राजवटीवरच होती.

यानंतर पुढच्या तीन महिन्यात इराणच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांचीही हत्या घडविण्यात आली. आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे मोटारीवर बसवलेल्या मशिनगनचा वापर करून फखरीझादेह यांची हत्या केल्याचा आरोप इराणने केला होता. सदर यंत्रणा इराणमध्ये कशी पोहोचली, याचा छडा लावण्यात इराणची यंत्रणा अपयशी ठरल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

याशिवाय नातांझ या इराणच्या अणुकार्यक्रमातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पात दोन वेळा स्फोट झाले. गेल्या आठवड्यात नातांझमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद इराणच्या संसदेतही उमटले आहेत. त्यामुळे आपला देश परदेशी गुप्तहेेरांसाठी स्वर्ग ठरत असल्याची टीका इराणी संसदेच्या धोरणात्मक विभागाच्या प्रमुखांनी केली होती. याशिवाय इराणच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या राजीनाम्याची मागणी इराणच्या संसदेत करण्यात आल्याची माहिती द न्यूयॉर्क टाईम्सने दिली.

याआधीही इराणचे शास्त्रज्ञ व लष्करी ठिकाणांवर हल्ले झाले होते. पण गेल्या नऊ महिन्यांमध्ये या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. त्याचबरोबर मोसादने घडविलेल्या या हल्ल्यांना इराणमधूनच सहाय्य मिळत आहे. पण या हस्तकांना अटक करण्यात किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात इराणच्या यंत्रणेला यश मिळालेले नाही व हीच इराणच्या राजवटीसाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हटले आहे. यामुळे इराणमध्ये खोलवर मोसादचे जाळे पसरलेल्याचे उघड झाले असून त्यांच्या व्यवस्थेसमोर इराणची राजवट निष्प्रभ ठरत असल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्र करीत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info