लंडन/बीजिंग – झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अनन्वित अत्याचार करून नरसंहार केला, मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा ठराव ब्रिटनच्या संसदेत मंजूर झाला आहे. अमेरिका, बेल्जिअम, नेदरलँड आणि कॅनडानंतर उघूरांच्या वंशसंहारासंबंधीचा ठराव संसदेत पारित करणारा ब्रिटन पाचवा नाटोसदस्य देश ठरला आहे. यामुळे खवळलेल्या चीनने ब्रिटनच्या संसदेत पारित झालेला ठराव निराधार असल्याची टीका करून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
गेल्या महिन्यात अमेरिका, युरोपिय महासंघ व ऑस्ट्रेलियासह ब्रिटनने उघुरवंशियांच्या मुद्यावर चीनविरोधात कारवाईची घोषणा केली होती. त्यानुसार, ब्रिटनच्या संसदेमध्ये चीनच्या अधिकार्यांवर निर्बंधांची कारवाईही केली होती. त्याचबरोबर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने झिंजियांग प्रांतातील उघूरांचा नरसंहार घडविल्याचा आरोप ब्रिटनच्या संसदसदस्यांनी केला होता. उघूरांवरील या अत्याचारावर संताप व्यक्त करून ब्रिटिश संसदनेत्यांनी चीनच्या विरोधात ठराव मांडला होता.
ब्रिटनच्या या कारवाईचा चीनच्या सत्ताधारी राजवटीला जबरदस्त धक्का बसला होता. संतापलेल्या चीनने ब्रिटनच्या ११ जणांवर निर्बंध घोषित केले होते. यामध्ये सर इयान डंकन स्मिथ, टॉम ट्युगेंडहॅट, नील ओब्रायन, टिम लॉटन व नुसरत गनी अशा नऊ संसद सदस्यांचा तर चार अभ्यासगटांचा समावेश होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चीनच्या या निर्बंधांवर टीका करून आपले सरकार संसदसदस्यांच्या पाठीशी असल्याची घोषणा केली होती. गुरुवारी ब्रिटनच्या संसदेत सदर ठराव मंजूर झाला.
झिंजियांगच्या मोठ्या कारागृहात उघूरवंशियांना डांबून चीन मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप ब्रिटनने केला आहे. चीनच्या झिंजियांग प्रांताच्या शू गुईशियांग या अधिकार्याने ब्रिटनच्या या ठरावावर टीका केली. ब्रिटिश संसदेचा निर्णय निराधार असून काही नेत्यांच्या आरोपांच्या आधारावर असे आरोप होत असल्याचे गुईशियांग यांनी म्हटले आहे. तर ब्रिटन आधीच अंतर्गत समस्यांना सामोरे जात असून ब्रिटनने यामध्ये लक्ष घालावे. चीनच्या अंतर्गत कारभारात ब्रिटनने नाक खूपसू नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |